अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात देण्यात आले इन्सुलिन, शुगर लेव्हल पोहोचली होती 320 पर्यंत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 09:55 AM2024-04-23T09:55:21+5:302024-04-23T09:55:46+5:30
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांची शुगर लेव्हल 320 पर्यंत पोहोचली होती.
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तिहार तुरुंगात इन्सुलिन देण्यात आले आहे. आम आदमी पक्षाच्या सूत्रांनी केलेल्या दाव्यानुसार, अरविंद केजरीवाल यांची शुगर लेव्हल सातत्याने वाढत होती. अरविंद केजरीवाल यांची शुगर लेव्हल 320 पर्यंत पोहोचली होती. ईडीच्या अटकेनंतर पहिल्यांदाच त्यांना इन्सुलिन देण्यात आले आहे.
याआधी, सोमवारी दिल्लीतील राउज एव्हेन्यू न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांचा अर्ज फेटाळला होता. ज्यामध्ये अरविंद केजरीवाल यांनी दररोज 15 मिनिटे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शुगर लेव्हलच्या उपचारांसाठी आपल्या खासगी डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी परवानगी मागितली होती. या सुनावणीदरम्यान न्यायालयाच्या विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांनी अरविंद केजरीवाल यांना न्यायालयीन कोठडीत असताना पुरेसे वैद्यकीय उपचार देण्यास सांगितले.
याचबरोबर, अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात विशेष सल्लामसलत आवश्यक असल्यास, कारागृह अधिकारी एम्स दिल्लीच्या संचालकांनी स्थापन केलेल्या वैद्यकीय समितीचा सल्ला घेतील, असा आदेश न्यायालयाने दिला होते. तसेच, वैद्यकीय समिती ही अरविंद केजरीवाल यांच्या वैद्यकीय गरजा आणि त्यांची महत्त्वाची आकडेवारी लक्षात घेऊन त्यांच्यासाठी आहार आणि व्यायाम यासंदर्भात योजना तयार करेल.
याशिवाय, न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले होते की, यादरम्यान अरविंद केजरीवाल न्यायालयाच्या आधीच्या आदेशानुसार आणि त्यांच्या वैयक्तिक डॉक्टरांनी दिलेल्या आहार चार्टनुसार घरी शिजवलेले अन्न खाऊ शकतात. तसेच, अरविंद केजरीवाल यांना इन्सुलिन देण्याची गरज आहे का, हे सांगण्यासाठी वैद्यकीय समितीने 'लवकरात लवकर' अहवाल सादर करण्याची विनंती न्यायालयाने केली होती.
दरम्यान, गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. यामध्ये म्हटले होते की, तुरुंग अधिकाऱ्यांनी त्यांना इन्सुलिन देण्याचे आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नियमित डॉक्टरांचा सल्ला घेण्याची परवानगी मागितली होती.