अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदीयांनी सरकारी बंगला रिकामा केला; आता कुठे राहणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2024 03:48 PM2024-10-03T15:48:02+5:302024-10-03T15:48:23+5:30
मनीष सिसोदीया यांच्या बंगल्यात दिल्लीच्या विद्यमान मुख्यमंत्री आतिशी राहणार आहेत.
नवी दिल्ली: आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी आपला सरकारी बंगला सोडला आहे. आता सिसोदिया आपल्या कुटुंबासह आपचे खासदार हरभजन सिंग यांच्या बंगल्यात शिफ्ट झाले आहेत. सिसोदिया यांचा AB-17 बंगला दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांच्या नावावर झाला आहे. विशेष म्हणजे, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उद्या आपला सरकारी बंगला सोडणार आहेत.
दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्याचे आरोप लागल्यानंतर मनीष सिसोदिया यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर त्यांच्याकडे असलेली शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी विद्यमान मुख्यमंत्री आतिशी यांच्याकडे देण्यात आली. तर, याच घोटाळ्याचे आरोग लागल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनीदेखील काही दिवसांपूर्वी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला, त्यामुळे त्यांनाही आपला सरकारी बंगला रिकामा करावा लागत आहे.
अरविंद केजरीवाल कुठे राहणार?
अरविंद केजरीवाल उद्या (4 ऑक्टोबर) आपला सरकारी बंगला रिकामा करणार आहेत. सरकारी निवासस्थान सोडल्यानंतर केजरीवाल आणि त्यांचे कुटुंब 5, फिरोजशाह रोड येथे 'आप'चे खासदार अशोक मित्तल यांच्या बंगल्यावर राहणार आहेत. केजरीवालांनी 17 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हाच त्यांनी सरकारी बंगला सोडण्याची घोषणा केली होती. त्यानुसार, उद्या ते बंगला रिकामा करतील.
केजरीवाल मित्तल यांच्या घरी किती दिवस राहणार?
दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज म्हणाले की, 'सुरुवातीला केजरीवालांनी आपल्या मतदारसंघात राहण्याचा निर्णय घेतला होता. पण, नंतर त्यांनी तो निर्णय बदलून मित्तल यांच्या बंगल्याच राहण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत ते पुन्हा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होत नाहीत, तोपर्यंत ते याच पत्त्यावर राहणार आहेत.
आमदारांना सरकारी घरे मिळत नाहीत
मनीष सिसोदिया आणि अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा मंत्री राहिले नाहीत. ते आता फक्त दिल्लीचे आमदार आहेत. दिल्लीत आमदारांना सरकारी घरे मिळत नाहीत. त्यामुळे दोन्ही आमदारांचा मुक्काम आपच्या खासदारांच्या निवासस्थानी असणार आहे.