Gujarat Elections 2022: “पैसे तुमच्या पक्षाकडून घ्या, पण काम ‘आप’चं करा”; केजरीवालांचे भाजप कार्यकर्त्यांना आवाहन!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2022 03:41 PM2022-09-03T15:41:41+5:302022-09-03T15:43:21+5:30
Gujarat Elections 2022: आमच्याकडे पैसे नाहीत. पण तुम्ही एवढी वर्ष पक्षाची सेवा केली, तुम्हाला काय मिळाले, असा रोकडा सवाल अरविंद केजरीवाल यांनी भाजप कार्यकर्त्यांना केला आहे.
Gujarat Elections 2022: गेल्या काही दिवसांपासून गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि आम आदमी पक्षातील संघर्ष तीव्र होताना पाहायला मिळत आहे. या वर्षाच्या अखेरीस गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. सर्व राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मात्र, या निवडणुकीत आप आणि भाजपमध्ये थेट लढत होण्याची चिन्हे आहेत. यातच आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी, आमच्याकडे पैसे नाहीत. तुम्ही तुमच्या पक्षातच राहा. पैसे तुमच्या पक्षाकडून घ्या; पण, काम आम आदमी पक्षाचे करा, असे आवाहन भाजप कार्यकर्त्यांना केले आहे.
अरविंद केजरीवाल यांनी राजकोटमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना गुजरातमधील भाजप कार्यकर्त्यांना हे आवाहन केले. मी तुम्हाला या साऱ्याचे आश्वासन देतो. तुम्हाला भाजप सोडायची गरज नाही. तुम्ही भाजपमध्ये राहा. काम आमच्यासाठी म्हणजे आपसाठी काम करा. अनेकांना ते पैसे देतात. तर पैसे त्यांच्याकडूनच घ्या. आमच्याकडे पैसे नाहीत, असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.
तुम्ही एवढी वर्ष भाजपची सेवा केली, तुम्हाला काय मिळाले?
आम्हाला भाजपचे नेते नकोत. त्यांनी ते त्यांच्या जवळ ठेवावेत. आम्हाला भाजपचे जेवढे पन्नाप्रमुख आहेत, कार्यकर्ते आहेत, गावागावांमधील, तालुक्यांमधील आणि मतदान केंद्रांवरील भाजप समर्थक आमच्याशी जोडले जात आहेत. यामध्ये अनेक लोक फार चांगले आहेत. त्यांना मी आवाहन करतो. तुम्ही एवढी वर्ष भाजपची सेवा केली. तुम्हाला काय मिळाले? तुमच्या मुलांना शाळा दिल्या यांनी? तुमच्यासाठी रुग्णालये बांधली का? तुमच्या घरामध्ये कोणी आजारी पडले तर उपाचारांसाठी जमीन किंवा दागिने गहाण टाकावे लागतात की नाही? तुम्हालाही विजेची मोठी बिले द्यावी लागतात की नाही, भाजपवाले असले तरी? अशी विचारणा अरविंद केजरीवाल यांनी केली.
दरम्यान, आमचे सरकार आले की, आम्ही मोफत वीज देऊ तेव्हा तुम्हालाही मोफत वीज मिळेल. मी तुम्हाला २४ तास मोफत वीज देईन. तुमच्या मुलांसाठी चांगल्या शाळा उभारीन. मी मोफत शिक्षण देईन. मी तुमच्या कुटुंबावर मोफत आणि उत्तम आरोग्य सेवा देईन. मी तुमच्या घरातील महिलांना एक एक हजार रुपये देईन, असे आश्वासन केजरीवाल यांनी दिले.