जामीन मिळवण्यासाठी केजरीवाल जाणूनबुजून गोड पदार्थ खात आहेत; ED चा कोर्टात दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 03:33 PM2024-04-18T15:33:54+5:302024-04-18T15:34:00+5:30
न्यायालयाने अरविंद केजरीवालांना तुरुंगात घरचे अन्न खाण्याची परवानगी दिली आहे.
Arvind Kejriwal Arrest : मुख्यमंत्री अरविंद केजरीवालदिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी तिहार तुरुंगात कैद आहेत. केजरीवालांना मधुमेह असून, तुरुंगात गेल्यामुळे त्यांचा मधुमेह वाढल्याची तक्रार आपकडून सातत्याने करण्यात येत आहेत. आज या प्रकरणाची दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान ED ने दावा केला की रक्तातील साखरेची पातळी वाढावी आणि वैद्यकीय कारणास्तव जामीन मिळावा, यासाठी केजरीवाल जाणूनबुजून जास्त मिठाई खात आहेत.
न्यायालयाने डाएट चार्ट मागवला
अरविंद केजरीवाल यांच्या वकिलाने न्यायालयात सांगितले की, उपाशीपोटी त्यांची शुगर लेव्हल 243 होती, जी खूप जास्त आहे. केजरीवालांना डॉक्टरांच्या सूचनेनुसारच जेवण दिले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यावर कोर्टाने केजरीवालांचा डाएट चार्ट मागवला.
दरम्यान, ईडीने न्यायालयाला सांगितले की, केजरीवालांना घरचे अन्न खाण्याची परवानगी आहे. पण, त्यांना बीपी आणि टाईप-2 मधुमेह आहे. अशा परिस्थितीत ते घरातून डब्ब्यात आलेले आलू पुरी, आंबा आणि मिठाई खात आहेत. वैद्यकीय आधारावर जामीन मिळवण्यासाठी केजरीवाल जाणूनबुजून जास्त गोड पदार्थ खात आहेत. यावर न्यायालयाने तुरुंग प्रशासनाकडून अहवाल मागवण्याचे निर्देश दिले. आता यावर उद्या(दि.19) सुनावणी होणार आहे.