Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला; CCTV कॅमरे आणि सिक्योरिटी बॅरिकेडची तोडफोड, मनीष सिसोदियांचा भाजपवर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 02:28 PM2022-03-30T14:28:22+5:302022-03-30T16:30:48+5:30
अरविंद केजरीवाल यांच्या घराबाहेर भाजप युवा मोर्चाचे आंदोलन सुरू होते, यादरम्यान सीसीटीव्ही आणि बॅरिकेडची तोडफोड करण्यासोबतच गेटवर लाल रंग लावण्यात आला.
नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला झाल्याची बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली. 'काही समाजकंटकांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या घरावर हल्ला केला आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह बॅरीकेडची तोडफोड केली,' अशी माहिती सिसोदिया यांनी दिली.
बीजेपी के गुंडे CM @ArvindKejriwal जी के घर पर तोड़फोड़ करते रहे. बीजेपी की पुलिस उन्हें रोकने की जगह उन्हें घर के दरवाज़े तक लेकर आई. https://t.co/oSFc2kWaDC
— Manish Sisodia (@msisodia) March 30, 2022
भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला करुन तोडफोड केल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. अरविंद केजरीवाल यांनी काश्मिरी पंडितांच्या हत्याकांडाची खिल्ली उडवली असल्याचे भाजपचे म्हणणे आहे. त्याविरोधात भाजपकडून केजरीवालांविरोधात निदर्शने सुरू होते. मनीष सिसोदिया यांनी भाजपवर या हल्ल्याचा आरोप लावला आहे. 'भाजपच्या गुंडांनी अरविंद केजरीवाल यांच्या घराची तोडफोड केली. भाजपच्या पोलिसांनी त्यांना थांबवण्याऐवजी दारापर्यंत आणले', असा आरोपही सिसोदिया यांनी केला आहे.
गेटवर लाल रंग लावला...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप युवा मोर्चाच्या सुमारे 150-200 कार्यकर्त्यांनी सकाळी 11.30 वाजता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने सुरू केली. द काश्मीर फाइल्स चित्रपटाबाबत विधानसभेत केजरीवाल यांच्या विधानाविरोधात हे निदर्शने करण्यात येत होती.1 वाजण्याच्या सुमारास काही आंदोलक बॅरिकेड तोडून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर पोहोचले. त्यांनी दरवाजावर रंगरंगोटी केली आणि येथे लावलेले सीसीटीव्ही कॅमेरेही फोडले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून 70 जणांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे.