सीबीआय चौकशीनंतर अरविंद केजरीवाल झाले सौम्य? पंतप्रधानांवर टीका करताना नाव घेणे टाळले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 07:26 AM2023-04-18T07:26:58+5:302023-04-18T07:27:30+5:30
Arvind Kejriwal : सीबीआयपुढे तब्बल नऊ तास चौकशीला हजर राहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी झालेल्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा आक्रमकपणा काहीसा कमी झालेला दिसून आला.
नवी दिल्ली : सीबीआयपुढे तब्बल नऊ तास चौकशीला हजर राहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी झालेल्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा आक्रमकपणा काहीसा कमी झालेला दिसून आला. यावेळी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी पंतप्रधानांचे नाव न घेता टीका केली.
मद्य धोरण घोटाळ्यात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची रविवारी तब्बल नऊ तास चौकशी झाली. यानंतर दुसऱ्याच दिवशी दिल्ली विधानसभेचे अधिवेशन झाले. यात दुपारी मुख्यमंत्री केजरीवाल यांचे भाषण झाले. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी हल्ला तर चढविला, परंतु पंतप्रधानांचे एकदाही नाव घेतले नाही.
देशाचा विकास करावयाचा असल्यास देशाचा प्रमुख शिकलेला पाहिजे. अशिक्षित व्यक्ती देशाचा विकास करू शकत नाही, अशा शब्दांत केजरीवाल यांनी टीका केली. देशाच्या राजाने नोटबंदी व कृषी कायदे संमत करण्याचे निर्णय घेतले. राजा अशिक्षित असल्याने त्यांचे मित्र चुकीचा सल्ला देतात. नोटाबंदीच्या निर्णयाने तर देशाचा विकास १० ते १५ वर्षे मागे गेला. राजाने आपल्या मित्राला खैरात वाटली. यामुळे सामान्य माणसाला महागाईला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला.