अरविंद केजरीवालांना मोठा धक्का! CM हाऊस नूतनीकरण प्रकरणात CBI ची एन्ट्री, चौकशी होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 07:52 PM2023-09-27T19:52:45+5:302023-09-27T20:00:38+5:30
Arvind Kejriwal: मुख्यमंत्री निवासस्थानाच्या नूतनीकरणासंदर्भातील कथित घोटाळ्याप्रकरणी आता सीबीआय चौकशी करणार आहे.
Arvind Kejriwal: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री निवासस्थान नूतनीकरणासंदर्भात मोठी अपडेट समोर येत आहे. या प्रकरणात आता सीबीआयने एन्ट्री घेतली असून, या सपूर्ण प्रकाराची चौकशी केली जाणार आहे. काही दिवसांपूर्वी याच शासकीय बंगल्याच्या नूतनीकरण प्रकरणी कॅगच्या विशेष ऑडिटला मान्यता देण्यात आली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआयने मुख्यमंत्री निवासस्थान नूतनीकरण प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. गृह मंत्रालयाने मुख्यमंत्री निवासस्थान नूतनीकरण प्रकरणातील कथित घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मे महिन्यात दिल्लीच्या नायब राज्यपालांनी सीबीआयला पत्र लिहून या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी केली होती. त्याआधारे गृह मंत्रालयाने सीबीआय तपासाला परवानगी दिली. दिल्लीच्या मुख्य सचिवांनी केलेल्या तपासानंतर समोर आलेल्या कथित अनियमिततेची आता सीबीआय चौकशी करणार आहे. या प्रकरणी सीबीआय तपासाच्या आदेशानंतर आम आदमी पक्षाने केंद्र सरकार आणि भाजपवर टीका केली आहे.
आम आदमी पक्ष संपवण्यासाठी भाजपने सर्व ताकद लावली
आम आदमी पक्ष संपवण्यासाठी भाजपने आपली सर्व ताकद लावल्याची टीका करण्यात आली आहे. पक्षाच्या वतीने सांगण्यात आले आहे की, संपूर्ण देशात फक्त आम आदमी पक्ष असा आहे, जो शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट काम करून मते मागत आहे. गरिबांना चांगले शिक्षण आणि उत्तम आरोग्य सुविधा मिळाव्यात असे भाजपला वाटत नाही. भाजपच्या धर्म आणि जातीच्या राजकारणाचा पराभव होईल. मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांना तुरुंगात टाकण्यात आले. आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना घेरण्याचा प्रयत्न केला जात असून, त्यासाठी सर्व तपास यंत्रणांना कामाला लावण्यात आले आहे. पण दिल्लीतील दोन कोटी जनतेचे प्रेम आणि आशीर्वाद अरविंद केजरीवाल यांच्यासोबत आहेत, असा विश्वास आम आदमी पक्षाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान, आत्तापर्यंत अरविंद केजरीवाल यांच्यावर ५० हून अधिक खटले दाखल केले आहेत आणि तपास केला आहे. त्यापैकी एकही गोष्ट सिद्ध झालेली नाही. यातूनही काही निष्पन्न होणार नाही. भाजपने कितीही तपास वा चौकशी केली तरी अरविंद केजरीवाल सर्वसामान्यांच्या हितासाठी लढत राहतील. अरविंद केजरीवाल यांनी शपथ घेतली आहे की, आपण भारताला जगातील नंबर वन देश बनवू. यासाठी कोणतीही किंमत मोजण्यास तयार आहे, असे आम आदमी पक्षाने स्पष्टपणे म्हटले आहे.
नेमके प्रकरण काय?
अरविंद केजरीवाल यांच्या बंगल्याच्या नूतनीकरणासाठी सुमारे ४५ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातील एका पडद्याची किंमत ८ लाख रुपयांच्या घरात आहे आणि असे २३ पडदे मागवण्यात आले आहेत. १ कोटी १५ लाख किमतीचे मार्बल व्हिएतनाममधून आयात करण्यात आले आहेत, तर ४ कोटी किमतीचे प्री-फॅब्रिकेटेड लाकूड बसवण्यात आले आहे. घरातील कामासाठी पहिली मंजुरी १ सप्टेंबर २०२० रोजी मिळाली होती. यामध्ये लायटिंग काम आणि स्वयंचलित फायर अलार्म सिस्टमसह आरसीसी-फ्रेम केलेल्या संरचनेवरच्या कामाचा समावेश होता. दुसरी मंजुरी मे २०२१ मध्ये मॉड्यूलर किचन, लॉन्ड्री आणि पॅन्ट्री इत्यादी बनवण्यासाठी देण्यात आली.