500 रुपयांत येतात अन्...; केजरीवालांच्या वक्तव्यावरून राजकीय राडा!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 01:12 PM2019-09-30T13:12:42+5:302019-09-30T13:24:37+5:30
केजरीवालांचे काळीज का फाटतय?
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या एका वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. दिल्लीतील रुग्णालयांमध्ये बाहेरील राज्यातील लोक येऊन पाच लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार करून घेण्याचा फायदा घेत आहेत, असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. यावरून भाजपा आणि जेडीयूने अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे.
अरविंद केजरीवाल यांनी इतर राज्यातून (खासकरून बिहार) दिल्लीत येणाऱ्या लोकांवर निशाणा साधला. यावरुन विरोध पक्षाच्या नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेत त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. दिल्लीतील भाजपाचे अध्यक्ष मनोज तिवारी यांनी बिहारहून लोक येत असल्यामुळे अरविंद केजरीवाल यांचे काळीज का फाटत आहे, असा सवाल केला आहे. तर, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची पार्टी जेडीयूने सुद्धा नाराजी व्यक्त केली आहे.
अरविंद केजरीवाल काय म्हणाले?
अरविंद केजरीवाल यांनी काल एका कार्यक्रमात आरोग्य व्यवस्थेचा उल्लेख केला. यावेळी ते म्हणाले," उपचार करण्यासाठी दिल्लीत बाहेरून जास्त लोक येत आहेत. बिहारमधून एक व्यक्ती 500 रुपयांचे तिकीट घेऊन दिल्लीत येतो आणि 5 लाख रुपयांचे ऑपरेशन मोफत करून घेतो."
#WATCH Delhi CM: One person from Bihar buys a ticket to Delhi for Rs 500, returns after availing free treatment worth Rs 5 lakhs. While it makes us happy as they are people of our own country, but Delhi has its own capacity. How can Delhi serve people of entire country? (29.09) pic.twitter.com/qW1hvryPnK
— ANI (@ANI) September 30, 2019
केजरीवालांचे काळीज का फाटतंय?
दिल्ली भाजपाचे अध्यक्ष मनोज तिवारी यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, "पुन्हा एकदा त्यांनी (केजरीवाल) द्वेष दाखविला आहे. जर बिहारचा व्यक्ती दिल्लीत उपचार करतो, तर अरविंद केजरीवाल यांचे काळीज का फाटते? 5 लाखांपर्यंत मोफत उपचार योजना अरविंद केजरीवाल यांनी आणली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही योजना आणली आहे, ज्याला आपण आयुष्मान भारता बोलतो."
बाळासाहेब ठाकरेंसारखे केजरीवालांनी बोलू नये - जेडीयू
जेडीयूचे वरिष्ठ नेता केसी त्यागी यांनी अरविंद केजरीवाल यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. अरविंद केजरीवाल बिहार आणि उत्तर प्रदेशातील लोकांमुळेच निवडणूक जिंकले होते. ते एख सन्मानीय नेते आहेत. त्यामुळे त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे बोलू नये, असे केसी त्यागी यांनी म्हटले आहे. तसेच, ते म्हणाले, "राष्ट्रीय राजधानी फक्त आम आदमी पार्टीची नाही आहे. याठिकाणी देशाच्या प्रत्येक कोपऱ्यातून लोक उपचारासाठी येतात."