Delhi Arvind Kejriwal : “आता सिसोदियांना अटक करण्याचा केंद्राचा डाव, पंतप्रधानांनी आम्हाला एकत्र तुरूंगात टाकावं”
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2022 12:34 PM2022-06-02T12:34:27+5:302022-06-02T12:43:20+5:30
Delhi Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा केंद्र सरकारवर निशाणा. सत्येंद्र जैन यांच्यानंतर आता सिसोदियांना अटक करण्याचा कट रचला जात असल्याचा केला आरोप.
Delhi Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi CM Arvind Kejriwal) यांनी मोठा दावा केला आहे. आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन (Satyendra Jain) यांच्यानंतर आता मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांना खोट्या प्रकरणात अडकवून अटक करण्याचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. “मी पंतप्रधान मोदींना हात जोडून विनंती करतो की, एकामागून एक अटक करू नका. याचा परिणाम दिल्लीच्या विकास कामावर होतो. यापेक्षा दिल्लीतील सर्व मंत्री-आमदारांना अटक करून चौकशी केली पाहिजे,” असं केजरीवाल म्हणाले.
सत्येंद्र जैन यांना ईडीनं कथितरित्या मनी लाँड्रिंग प्रकरणी अटक केली आहे. याबाबातच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरूवारी एका पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. “मला वाटतं सत्येंद्र जैन आणि मनीष सिसोदिया यांना खोट्या प्रकरणांमध्ये तुरुंगात टाकून या लोकांना दिल्लीत शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात सुरू असलेले चांगले काम थांबवायचे आहे. पण काळजी करू नका, मी तसे होऊ देणार नाही. सर्व चांगली कामं सुरूच राहील,” असं केजरीवाल म्हणाले.
I request PM Modi to put all the ministers and MLAs from AAP behind the bars and ask all the central agencies to do all investigations at a go. Do as many raids as you want. You arrest one minister at a time, it obstructs public works: Delhi CM Arvind Kejriwal pic.twitter.com/0h0EhjC6GN
— ANI (@ANI) June 2, 2022
“मी काही महिन्यांपूर्वीच सांगितलं होतं केंद्र सरकार बनावट प्रकरणात सत्येंद्र जैन यांना अटक करणार आहे. माझ्या विश्वसनीय सूत्रांनी मला लवकरच सिसोदिया यांना अटक केली जाणार असल्याचं सांगितलं आहे. केंद्रानं त्यांच्याविरोधात बनावट प्रकरणं तयार करण्याचे आदेश दिले आहेत,” असा आरोप त्यांनी केला.
सिसोदिया शिक्षणातील क्रांतीचे जनक
मनीष सिसोदिया हे भारताच्या शैक्षणिक क्रांतीचे जनक आहेत, कदाचित ते स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सर्वोत्तम शिक्षण मंत्री आहेत. दिल्लीच्या सरकारी शाळांमध्ये १८ लाख मुले शिकतात. त्यांनी या मुलांना उज्ज्वल भविष्याची आशा दिली आहे. मला माहित नाही जैन, सिसोदिया यांना तुरुंगात पाठवण्यामागे काय राजकारण आहे, याने देशाचेच नुकसान होणार असल्याचं केंजरीवाल यांनी म्हटलं.