"विरोधीपक्षाची भूमिका चोख बजावू, गेल्या १० वर्षात..."; दिल्ली पराभवावर केजरीवाल काय म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 15:33 IST2025-02-08T15:33:18+5:302025-02-08T15:33:50+5:30
Arvind Kejriwal Reaction on AAP Loss, Delhi Assembly Elections 2025 : आम आदमी पक्षाचे अनेक दिग्गज नेतेमंडळी यंदाच्या निवडणुकीत पराभूत झाले.

"विरोधीपक्षाची भूमिका चोख बजावू, गेल्या १० वर्षात..."; दिल्ली पराभवावर केजरीवाल काय म्हणाले?
Arvind Kejriwal Reaction on AAP Loss, Delhi Assembly Elections 2025 : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत भाजपा महायुतीने जोरदार मुसंडी मारत सत्तास्थापना केली. महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजपाचा मुख्यमंत्री बसला. याचीच पुनरावृत्ती दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात पाहायला मिळाली. गेली २७ वर्षे सत्तेपासून दूर असलेल्या भाजपाने अखेर दिल्ली जिंकली आणि आम आदमी पक्षाला मोठा धक्का दिला. ७० विधानसभा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाने बहुमतापेक्षाही खूप मोठी झेप घेत साऱ्यांनाच अवाक् केले. आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही पराभवाचा धक्का बसला. नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून त्यांचा पराभव झाला. आपचे अनेक बडे दिग्गज नेते पराभूत झाले. दारूण पराभव झाल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.
केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया
आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी एक प्रसिद्धीपत्रक जारी केले. त्यात त्यांनी भाजपाला शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, मी भाजपाला विजयाच्या शुभेच्छा देतो. मी अशी अपेक्षा करतो की दिल्लीच्या जनतेने भाजपाला ज्या गोष्टींसाठी मतं दिली आहेत, ती विधायक कामे भविष्यात भाजपाकडून नीट पार पाडली जातील. गेल्या १० वर्षात आमच्या पक्षाने प्रत्येक क्षेत्रात कार्यरत राहून दिल्लीचा विकास केला. दिल्लीकरांना सर्व सोयीसुविधा देण्याचा आमचा प्रयत्न राहिला. दिल्लीतील पायाभूत सुविधा सुधारण्यावरही आम्ही काम केले. आता आम्ही विरोधीपक्षाची भूमिकाही चोख पार पाडू. दिल्लीकरांच्या सुख-दु:खात आम्ही नक्कीच त्यांच्या सोबत असू. आम्ही राजकारणात सेवा करण्यासाठीच आलो आहोत. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी घेतलेल्या कष्टासाठी त्यांचे आभार, अशा भावना केजरीवाल यांनी व्यक्त केल्या.
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) February 8, 2025
केजरीवाल-सिसोदिया पराभूत, आतिशी विजयी
आपचे दोन दिग्गज पराभूत झाले. भाजपाच्या प्रवेश साहिब सिंग वर्मा यांनी अरविंद केजरीवालांना ३,१८६ मतांनी पराभूत केले. तर मनीष सिसोदिया यांना जंगपुरा मतदारसंघातून पराभव स्वीकारावा लागला. भाजपाचे तरविंदर सिंग मारवा यांनी ६०० हून जास्त मतांनी विजय मिळवला. पण दिल्लीच्या कालकाजी मतदारसंघातून लढणाऱ्या आपच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी मात्र विजय मिळवला. सलग दुसऱ्यांदा त्यांनी विधानसभा गाठली. या ठिकाणी काँग्रेसकडून अलका लांबा आणि भाजपाकडून रमेश बिधुरी अशी तिरंगी लढत होती. त्यात आतिशी यांनी सुमारे २५०० हून जास्त मतांनी बिधुरी यांचा पराभव केला. काँग्रेसच्या अलका लांबा यांनी ४००० मतांचा टप्पाही गाठता आला नाही.