लातूरला पाणीपुरवठा करण्यासाठी अरविंद केजरीवाल सरसावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2016 02:00 PM2016-04-12T14:00:11+5:302016-04-12T14:08:04+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून केजरीवालांनी मराठवाड्याला पुढील 2 महिने 10 लाख लीटर पाणीपुरवठा करण्याची तयारी दर्शवली आहे
Next
ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. १२ - दुष्काळग्रस्त मराठवाड्याला पाणीपुरवठा करण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पुढे सरसावले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून केजरीवालांनी मराठवाड्याला पुढील 2 महिने 10 लाख लीटर पाणीपुरवठा करण्याची तयारी दर्शवली आहे. केजरीवाल यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं लातूरमधील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी घेत असलेल्या प्रयत्नांचं कौतुकही केलं आहे. दुष्काळग्रस्त जिल्ह्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मदत करण्याचं आवाहन केजरीवालांनी यावेळी केलं आहे.
अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवलेलं पत्र शेअर केलं आहे. ज्यामध्ये केंद्रांच्या प्रयत्नांच कौतुक करत आपणही मदत करण्यासाठी इच्छुक असल्याचं लिहिलं आहे. '21व्या शतकात पाण्याच्या अभावामुळे जर कोणाचा मृत्यू झाला तर आपल्या सगळ्यांसाठी ही लाजीरवाणी गोष्ट असेल. या परिस्थितीत लातूरला मदत करणं सर्व देशवासीयांचं कर्तव्य असल्याचंही', केजरीवाल यांनी लिहिलं आहे.
यावेळी केजरीवाल यांनी दिल्लीतदेखील पाण्याची कमतरता असल्याचं मान्य केलं आहे. मात्र लातूरमधील भयानक परिस्थिती पाहता त्यांना मदत करण आपलं कर्तव्य असल्याचं केजरीवाल यांनी म्हंटलं आहे. इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही पत्र लिहून मदतीचं आवाहन करण्यात याव असं केजरीवालांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सुचवलं आहे.
दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दिक्षित यांनी मात्र केजरीवालांचा हा स्टंट असल्याची टीका केली आहे. ‘त्यांनी प्रथम दिल्लीची तहान भागवावी. दिल्लीतील अनेक भागात लोकांना पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. प्रथम दिल्लीतील लोकांना पाणी द्या. त्यानंतर लातूरविषयी बोला', असं शीला दिक्षित बोलल्या आहेत.
Delhi offers 10 lakh litres of water everyday for 2 months for brothers/sisters in Latur pic.twitter.com/SALb6Tf2kp
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) April 12, 2016