"प्रचार करताना तर काहीच त्रास झाला नाही, मग ..."; केजरीवालांच्या तब्येत ठीक नसल्याच्या दाव्यावर EDचे प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 05:19 PM2024-05-30T17:19:21+5:302024-05-30T17:22:30+5:30
सुप्रीम कोर्टाने दिल्लीचे मुख्ममंत्री अरविंद केजरीवाल यांना दिलेल्या दिलाशाचा वेळ संपत आला आहे. दुसरीकडे आता केजरीवालांच्या याचिकेवर ईडीने प्रत्युत्तर दिले आहे.
Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आता पुन्हा कोर्टात धाव घेत दिलासा मागितला आहे. अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी दिल्लीच्या ट्रायल कोर्टात कथित मद्य धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात नियमित जामीन मागितला आहे. यासोबत केजरीवाल यांनी वैद्यकीय कारणास्तव सात दिवसांच्या अंतरिम जामीनासाठीही याचिका कोर्टात दाखल केली. सुप्रीम कोर्टाने तात्काळ सुनावणीस नकार दिल्याने केजरीवाल यांनी राऊस एव्हेन्यू येथील ट्रायल कोर्टात या याचिका दाखल केल्या होत्या. दुसऱ्या याचिकेत त्यांनी प्रकृतीचे कारण देत सात दिवसांचा अंतरिम जामीन मागितला आहे. दुसरीकडे विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांनी नोटीस जारी करून दोन्ही याचिकांवर अंमलबजावणी संचालनालयाकडून उत्तर मागितले आहे.
राऊस एव्हेन्यू कोर्टाच्या विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांनी नोटीशीद्वारे केजरीवाल यांनी नियमित जामीन तसेच अंतरिम जामीनासाठी दाखल केलेल्या याचिकेवर अंमलबजावणी संचालनालयचे उत्तर मागितले होते. ईडीतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एसव्ही राजू यांनी याचिकांवर उत्तर दाखल करण्यासाठी वेळ मागितला आहे. ईडीची मागणी मान्य करत कोर्टाने याप्रकरणाची पुढील सुनावणी १ जून रोजी ठेवली. केजरीवाल यांना ट्रायल कोर्टातून दिलासा न मिळाल्यास त्यांना २ जून रोजी आत्मसमर्पण करून तुरुंगात जावं लागणार आहे. सुप्रीम कोर्टाने केजरीवाल यांना निवडणूक प्रचारात भाग घेण्यासाठी २१ दिवसांचा दिलासा दिला आहे. त्यानंतर केजरीवाल यांनी तब्येत बिघडल्याचे सांगून केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे जामिनाची मुदत ७ दिवसांनी वाढवण्याची मागणी केली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने तात्काळ सुनावणी करण्यास नकार दिला. यानंतर केजरीवाल यांनी ट्रायल कोर्टात धाव घेतली आहे होती.
या याचिकेला ईडीने विरोध करताना प्रचार करताना केजरीवाल यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नसल्याचे म्हटलं आहे. तसेच या प्रकरणात अनेक पद्धतीने दडपशाही होत आहे जी आम्ही रेकॉर्डवर आणू इच्छित आहेत, असेही ईडीने म्हटलं आहे. “ते सध्या कोठडीत नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला होता. ते आज पंजाबमध्ये प्रचार करत आहेत. त्यांची तब्येत त्यांना प्रचारापासून थांबवत नाहीये. आम्हाला फार कमी वेळ मिळावा म्हणून ते शेवटच्या क्षणी जामिनासाठी आले आहेत. त्यांचे आजचे वर्तन कोणत्याही न्यायास पात्र नाही,” असे एसव्ही राजू यांनी म्हटलं.
दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी वजन अचानक कमी होऊ लागल्याने किडनी खराब होणे, गंभीर हृदयरोग आणि कर्करोगासारखी लक्षण असल्याचे म्हणत पीईटी सीटी स्कॅनसह इतर वैद्यकीय चाचण्यांसाठी सात दिवसांसाठी अंतरिम जामीन वाढवून मागितला होता. मात्र सुप्रीम कोर्टाने त्यावर तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला. त्यानंतर केजरीवाल यांनी दिल्ली ट्रायल कोर्टात धाव घेतली.