Sunita Kejriwal : "अरविंद केजरीवाल यांची शुगर लेव्हल डाऊन; तुमच्या मुख्यमंत्र्यांना त्रास दिला जातोय"
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2024 17:08 IST2024-03-28T16:55:05+5:302024-03-28T17:08:32+5:30
AAP Sunita Kejriwal And Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांच्या प्रकृतीबाबत त्यांची पत्नी सुनीता केजरीवाल यांनी अपडेट दिली आहे.

Sunita Kejriwal : "अरविंद केजरीवाल यांची शुगर लेव्हल डाऊन; तुमच्या मुख्यमंत्र्यांना त्रास दिला जातोय"
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे. केजरीवाल यांच्या प्रकृतीबाबत त्यांची पत्नी सुनीता केजरीवाल यांनी अपडेट दिली आहे. केजरीवाल यांची शुगर लेव्हल डाऊन झाली असून प्रकृती ठीक नसल्याचा त्यांनी दावा केला आहे. तसेच तुमच्या मुख्यमंत्र्यांना त्रास दिला जात आहे. जनता याचं उत्तर देईल असंही त्यांनी म्हटलं.
दिल्लीतील राऊज एव्हेन्यू कोर्टाने अरविंद केजरीवाल यांना कुठलाही दिलासा न देता त्यांच्या ईडी कोठडीमध्ये चार दिवसांनी वाढ केली आहे. त्यामुळे आता 1 एप्रिलपर्यंत केजरीवाल यांना ईडीच्या ताब्यात राहावे लागणार आहे. 1 एप्रिल रोजी केजरीवाल यांना पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार आहे. या सुनावणीवेळी केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल याही कोर्ट रूममध्ये हजर होत्या.
ईडीच्या ताब्यात असूनही मुख्यमंत्री केजरीवाल यांना दिल्लीतील जनतेची कशी काळजी वाटत आहे, हे सुनीता केजरीवाल यांनी याआधी सांगितलं आहे. त्या म्हणाल्या होत्या की, "मुख्यमंत्र्यांनी संदेश दिला आहे की, 'माझे शरीर जेलमध्ये आहे, पण माझा आत्मा जनतेमध्ये आहे. डोळे बंद करा, मी तुमच्या अवतीभवती असल्याची जाणीव होईल.'"
"मुख्यमंत्र्यांना डायबेटीस आहे आणि त्यांची शुगर लेव्हल बरोबर नाही, तरीही त्यांचा निर्धार पक्का आहे. केजरीवाल यांनी मला सांगितलं की, दोन वर्षांत अडीच हजार छापे टाकूनही ईडीला एक पैसाही मिळाला नाही. 28 मार्च रोजी न्यायालयात मुख्यमंत्री पुराव्यासह तथाकथित दारू घोटाळ्याबाबत खुलासा करणार आहेत आणि पैसा कुठे आहे हे सांगणार आहेत."