Sanjay Singh : "अरविंद केजरीवालांना जीवे मारण्यासाठी..."; संजय सिंह यांचा इन्सुलिन न दिल्याचा मोठा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 12:18 PM2024-04-19T12:18:06+5:302024-04-19T12:26:03+5:30
Arvind Kejriwal And Sanjay Singh : आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी मोठा आरोप केला आहे. तिहार तुरुंगात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना इन्सुलिन दिले जात नसल्याचा दावा केला आहे.
आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी मोठा आरोप केला आहे. तिहार तुरुंगात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना इन्सुलिन दिले जात नसल्याचा दावा केला आहे. डाएट चार्टबाबत खोटं बोललं जात आहे. अरविंद केजरीवाल यांना जीवे मारण्याचा कट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इशाऱ्यावरून केजरीवाल यांच्या जीवाशी खेळले जात असल्याचा आरोप देखील संजय सिंह यांनी केला आहे.
दिल्लीच्या कॅबिनेट मंत्री आतिशी यांनी गुरुवारी दावा केला की, केजरीवाल यांना जेलमध्ये मिळणारे घरचे जेवण बंद करून त्यांना इन्सुलिन न देऊन त्यांचा जीव घेण्याचं 'मोठं षडयंत्र' रचलं जात आहे. दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे. मात्र, जेल अधिकाऱ्यांनी आतिशी यांचा हा आरोप फेटाळून लावला आहे.
ईडीने न्यायालयात दावा केला आहे की, 'टाइप 2' मधुमेहाने ग्रस्त असतानाही आप प्रमुखांना वैद्यकीय कारणास्तव जामीन मिळावा म्हणून ते दररोज आंबे आणि मिठाईसारखे जास्त साखरेचे पदार्थ खात आहेत. ईडीने सीबीआय आणि ईडी प्रकरणांसाठी विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांच्यासमोर हा दावा केला आहे. न्यायमूर्तींनी तिहार तुरुंग अधिकाऱ्यांना या प्रकरणी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले, ज्यामध्ये केजरीवाल यांच्या खाद्यपदार्थाचाही समावेश असावा.
आतिशी म्हणाल्या की, मुख्यमंत्र्यांची इन्सुलिनची विनंती तिहार तुरुंग प्रशासनाने फेटाळून लावली असून डॉक्टरांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्स आयोजित करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना ईडी आणि तुरुंग अधिकाऱ्यांचा विरोध होत आहे. त्या म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून केजरीवाल यांच्या रक्तातील साखरेची पातळी 300 mg/dl पेक्षा जास्त आहे.
आप नेत्यांनी आरोप केला आहे की, केजरीवाल यांनी वारंवार विनंती करूनही त्यांना इन्सुलिन दिलं जात नाही आणि त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी वाढत आहे. त्यांना औषध दिलं जात नाही कारण त्यांचा जीव घेण्याचा कट आहे. आतिशी यांनी केलेल्या दाव्याला उत्तर देताना तिहार तुरुंग प्रशासनाने अरविंद केजरीवाल यांच्या प्रकृतीबाबत जे काही बोलले ते चुकीचे असल्याचे सांगितले.