केजरीवाल, जंग संघर्ष पुन्हा पेटण्याची चिन्हे
By admin | Published: April 21, 2016 03:38 AM2016-04-21T03:38:56+5:302016-04-21T03:38:56+5:30
आम आदमी पक्षाच्या सरकारने नायब राज्यपाल नजीब जंग यांची पूर्वसंमती न घेता आपल्याकडे कारागृह महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविला आहे
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाच्या सरकारने नायब राज्यपाल नजीब जंग यांची पूर्वसंमती न घेता आपल्याकडे कारागृह महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविला आहे हे लक्षात आल्यावर जे. के. शर्मा या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने या पदाचा स्वीकारलेला पदभार परत केल्याने दिल्लीत पुन्हा एकदा लोकनियुक्त सरकार विरुद्ध नायब राज्यपाल अशा संघर्षाची ठिणगी पडण्याची चिन्हे आहेत.
अलोक वर्मा यांची दिल्लीच्या पोलीस आयुक्तपदी नेमणूक झाल्यानंतर २९ फेब्रुवारीपासून कारागृह महासंचालक हे पद रिक्त आहे. दिल्ली सरकारने मंगळवारी त्यांना कारागृह महासंचालक या पदाचाही अतिरिक्त कार्यभार स्वीकारण्याचे पत्र दिले. त्यानुसार शर्मा यांनी तिहारमध्ये जाऊन त्या पदाचा कार्यभार स्वीकारला. परंतु काही तासांतच त्यांनी हा कार्यभर ज्याच्याकडून घेतला त्याच्याकडे परत केला.
शर्मा यांनी सरकारला पाठविलेल्या पत्रात लिहिले की, आपण मला या पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारण्यास सांगितले. परंतु यास सक्षम प्राधिकाऱ्यांची (नायब राज्यपाल) पूर्व संमती नाही, असे समजते. परिणामी मी कार्यभार परत केला आहे. हा अतिरिक्त कार्यभार स्वीकारण्याचे पत्र शर्मा यांना दिल्ली सरकारच्या अतिरिक्त गृहसचिवांच्या स्वाक्षरीने दिले गेले होते. परंतु आपल्या संमतीविना केलेली ही पदभार नियुक्ती नायब राज्यपाल रद्द करू शकतात, याची कुणकुण लागल्यावर त्यांनी स्वीकारलेला कार्यभार परत केला, असे समजते.
गेल्या जूनमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नायब राज्यपालांची संमती न घेता अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेश मीना यांची लाचलुचपत प्रतिबंधक शाखेचे प्रमुख म्हणून नियुक्ती केली तेव्हापासून अशा नियुक्त्यांवरून मुख्यमंत्री व नायब राज्यपाल यांच्यात सुंदोपसुदी सुरु आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)