अरविंद केजरीवाल-कमल हसन यांच्यात आज चर्चा; चेन्नईत होणार भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2017 10:22 AM2017-09-21T10:22:36+5:302017-09-21T10:27:37+5:30
राजकारणात प्रवेश करण्याच्या तयारीत असलेले अभिनेते कमल हसन आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल भेट घेणार आहेत.
नवी दिल्ली, दि. 21- राजकारणात प्रवेश करण्याच्या तयारीत असलेले अभिनेते कमल हसन आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल भेट घेणार आहेत. केजरीवाल गुरूवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास चेन्नईत पोहोचणार असून त्यानंतर ही भेट होणार असल्याचं सुत्रांकडून समजतं आहे. पण या भेटीमागील कारणं नेमकं काय ? याबद्दलची माहिती मिळाली नाही. कमल हसन आणि अरविंद केजरीवाल यांची ही भेट राजकीय भेट असू शकते, असा अंदाज व्यक्त केला जातो आहे. अभिनेते कमल हसन राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे केजरीवाल-हसन यांची भेट राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जाते आहे. तसंच या भेटीच्या माध्यमातून केजरीवाल तामिळनाडूच्या राजकारणातील संधी शोधण्याच्या प्रयत्नात आहेत, अशीही चर्चा आहे.
केजरीवाल यांचा हा दौरा अधिकृत असल्याचं दिल्लीच्या मुख्यमंत्री कार्यालयातील सुत्रांकडून समजतं आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हसन हे केजरीवाल यांची भेट घेणार आहेत. ते दोघे दुपारी एकत्र जेवणार असून त्यावेळी विविध मुद्द्यांवर चर्चा करणार असल्याचं समजतं आहे. या भेटीसाठी कमल हसन यांनी अरविंद केजरीवाल यांना फोन केला होता आणि त्यानंतर भेट निश्चित झाल्याचं सुत्रांकडून समजतं आहे.
अभिनेते कमल हसन यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केला तर त्यांना सहकारी पक्ष म्हणून आम आदमी पक्ष मदत करेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. विशेष म्हणजे हसन यांनी या महिन्याच्या सुरुवातीलाच केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांची भेट घेतली होती. दुसरीकडे केजरीवाल यांनाही देशाच्या दक्षिण भागात पक्षविस्तार करायचा आहे. त्यामुळे केजरीवाल आणि हसन यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे.
आम आदमी पक्षाकडून सध्या पक्षविस्ताराचे प्रयत्न सुरू आहेत. दिल्ली व्यतिरिक्त पक्षाचा विस्तार करून राष्ट्रीय स्तरावर पक्ष नेऊन ठेवण्याचा आपचा विचार आहे. त्यामुळे चेन्नईत आज होणारी कमल हसन आणि अरविंद केजरीवाल यांची भेट एका नव्या अध्यायाची सुरूवात असू शकते, अशी चर्चा सध्या सुरू आहे. या वर्षाच्या सुरूवातीला आपने गोवा आणि पंजाबमधून निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत गोव्यामध्ये आपचा पराभव झाला पण पंजाबमध्ये विरोधी पक्ष म्हणून आप प्रस्थापित होऊ पाहतो आहे. तसंच गुजरात निवडणुकीत ठराविक जागा लढविण्याच्या विचारात आप आहे.