'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2024 20:28 IST2024-05-12T20:27:40+5:302024-05-12T20:28:36+5:30
Arvind Kejriwal Lok sabha Election : 'भाजपला रशिया आणि उत्तर कोरियाप्रमाणे भारतात हुकूमशाही आणायची आहे.'

'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
Arvind Kejriwal Lok sabha Election : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातील मोती नगरमध्ये रोड शो केला. यावेळी त्यांनी आपल्या अटकेविषयी भाष्य करताना जनतेला मतदानाचे आवाहन केले. तसेच, 'मला तुरुंगात का पाठवले, माझा काय दोष? मी दिल्लीसाठी काम केले, कदाचित त्यामुळेच भाजपने मला तुरुंगात पाठवले असेल,' अशी टीकाही केली.
नवी दिल्लीतील उमेदवार सोमनाथ भारती यांच्या प्रचारार्थ ते आले असता केजरीवाल म्हणतात, 'तुम्ही सर्वांनी माझ्यासाठी प्रार्थना केली. तुमच्या प्रेमामुळे आणि देवाच्या कृपेमुळेच मी आज तुमच्यामध्ये उभा आहे. आता हे लोक म्हणत आहेत की, 20 दिवसांनी मला पुन्हा तुरुंगात जावे लागेल. मला तुरुंगात जायची वेळ येऊ नये, असे तुम्हाला वाटत असेल, तर 25 मे रोजी झाडूचे बटन दाबा', असे आवाहनदेखील केजरीवालांनी यावेळी केले.
लोकसभा चुनाव प्रचार के तहत नई दिल्ली संसदीय सीट मोती नगर में CM @ArvindKejriwal और पंजाब के CM @BhagwantMann का विशाल रोड शो। LIVE https://t.co/dUFy46xGME
— AAP (@AamAadmiParty) May 12, 2024
'दिल्लीतील लोकांना मोफत वीज, पाणी आणि आरोग्य सुविधा दिल्या, हा माझा गुन्हा आहे. मी महिलांना मोफत बस प्रवास दिला, मी 500 शाळा बांधल्या, या गुन्ह्यासाठी भाजपने मला तुरुंगात टाकले. तुम्ही केंद्रात आहात, तुम्हाला तर 5 हजार शाळा बांधायच्या होत्या, पण त्याऐवजी तुम्ही मला तुरुंगात टाकायचे काम केले. भाजपकडून दिल्लीतील जनतेला ज्या सुविधा दिल्या जातात, त्या कुठेच दिसत नाहीत', अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
केजरीवाल पुढे म्हणाले, 'भाजपवाले म्हणतात 400 जागा द्या. हे लोक 400 जागा घेऊन काय करणार? त्यांचा उद्देश देशातून आरक्षण, संविधान आणि निवडणुका संपवण्या आहे. या लोकांना रशिया आणि उत्तर कोरियाप्रमाणे भारतात हुकूमशाही आणायची आहे. लोकांना नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदाराचे नावदेखील माहित नाही, त्या कोणाच्या फोनलाही उत्तर देत नाही,' असा दावाही त्यांनी केला.