केजरीवालांना दोन दिवसांत अटक होऊ शकते; आपच्या नेत्यांचा पुन्हा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 11:53 AM2024-02-23T11:53:43+5:302024-02-23T11:54:14+5:30
दिल्ली सरकारचे मंत्री सौरभ भारद्वाज आणि आतिशी यांनी पत्रकार परिषदेत हे आरोप केले आहेत.
आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांना ईडीने पुन्हा समन्स पाठविले आहेत. यामुळे केंद्र सरकार आणि भाजपावरआपने केजरीवांच्या अटकेचे प्रयत्न करत असल्याचे आरोप केले आहेत.
दिल्ली सरकारचे मंत्री सौरभ भारद्वाज आणि आतिशी यांनी पत्रकार परिषदेत हे आरोप केले आहेत. काँग्रेससोबत आघाडी केल्यास केजरीवालांना अटक होऊ शकते, असे भारद्वाज यांनी म्हटले आहे. भाजपा सुरुवातीला ईडीकडून आम्हाला घाबरवायचा प्रयत्न करत होती. आता सीबीआयद्वारे केला जात आहे. येत्या दोन-तीन दिवसांत केजरीवाल यांना अटक केली जाऊ शकते, असे भारद्वाज यांनी म्हटले आहे.
भाजपामध्ये भीती पसरली आहे. काँग्रेस आणि आप एकत्र आली तर त्यांच्या समस्या वाढतील. ज्या ज्या राज्यांत काँग्रेस आप यांची आघाडी होईल तिथे तिथे भाजपाला सत्तेत येणे कठीण जाणार आहे. ४०० पार जागा मिळविणारा माणूस कधी आपल्याच माजी राज्यपालाच्या घरी सीबीआय पाठवत नाही. ४०० पार जाणाऱ्याचे लक्ष्य हे प्रेमाचे असते, परंतु हे द्वेशाचे लक्षण आहे, अशी टीका भारद्वाज यांनी केली आहे.
केजरीवालांना अटक करायची असेल तर करा परंतु काँग्रेस आणि आपची आघाडी ही इंडिया आघाडीत होत आहे, ही थांबणार नाही, असे आतिशी यांनी म्हटले आहे.