अरविंद केजरीवालांनी सर्व दोष मनीष सिसोदिया यांच्यावर टाकला; सीबीआयचा मोठा दावा...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 03:07 PM2024-06-26T15:07:27+5:302024-06-26T15:07:49+5:30
Arvind kejriwal News: दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने मोठा खुलासा केला आहे.
Arvind kejriwal News :दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी तिहार तुरुंगात कैद आहेत. आता या प्रकरणाला एक नवे वळण लागले आहे. अरविंद केजरीवालांनी या प्रकरणाचा संपूर्ण ठपका माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर ठेवल्याचे सीबीआयने न्यायालयाला सांगितले आहे. तसेच, केजरीवालांनी आणखी चौकशी करण्याची गरज असल्याचेही सीबीआयचे म्हणने आहे.
सीबीआयने बुधवारी अरविंद केजरीवाल यांना राऊस एव्हेन्यू न्यायालयातून अटक केली. अटकेनंतरही सुनावणी सुरूच होती. यावेळी सीबीआयने युक्तिवाद केला. उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांच्या जामीनाला स्थगिती दिल्यानंतरच आम्ही अटक केल्याचे सीबीआयने म्हटले. यानंतर न्यायालयाने सीबीआयला अटकेचे कारण स्पष्ट करण्यास सांगितले होते. याला उत्तर देताना सीबीआयने दीर्घ युक्तिवाद केला.
सीबीआयने म्हटले की, 'आम्हाला केजरीवाल यांची कोठडीत चौकशी करण्याची गरज आहे. केजरीवाल सांगत नाहीयेत की, विजय नायर त्यांच्या हाताखाली काम करत होता की नव्हता. ते म्हणतात की, नायर आतिशी मार्लेना आणि सौरभ भारद्वाज यांच्या हाताखाली काम करायचा. तसेच, त्यांनी सगळा दोष मनीष सिसोदिया यांच्यावर टाकला आणि अबकारी धोरणाबाबत स्वतःला काहीही माहिती नसल्याचे सांगितले. लोकसभा निवडणुकीमुळे केजरीवालांना जामीन मिळाला. त्यावेळी आम्हाला त्यांची चौकशी करता आली नाही. त्यामुळे केजरीवाल यांची अटक आणि रिमांड आवश्यक असल्याचे सीबीआयच्या वकिलाने कोर्टाला सांगितले.
अरविंद केजरीवालांनी दावे फेटाळून लावले
दरम्यान, केजरीवालांनी सीबीआयचे दावे पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. केजरीवाल म्हणाले की, मीडियामध्ये जे काही सुरू आहे, ते चुकीचे आहे. मनीष सिसोदिया दोषी आहेत, असे विधान मी केलेले नाही. मी म्हणालो की, सिसोदिया निर्दोष आहेत आणि मीही निर्दोष आहे. माध्यमांमध्ये आमची बदनामी करण्यासाठी हे सांगितले जात आहे.