रिक्षा चालकाच्या घरी जेवणासाठी पोहोचले अरविंद केजरीवाल; पोलिसांनी रोखले, मग काय झाले? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2022 08:41 AM2022-09-13T08:41:17+5:302022-09-13T08:42:14+5:30
Arvind Kejriwal : अहमदाबादमध्ये सोमवारी अरविंद केजरीवाल यांनी रिक्षा चालकांची भेट घेऊन त्यांच्या समस्यांवर चर्चा केली.
अहमदाबाद : आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सोमवारी अहमदाबादमध्ये एका रिक्षा चालकाच्या घरी जेवणासाठी पोहोचले, त्यावेळी पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव अरविंद केजरीवाल यांना त्याठिकाणी जाऊ नये असे सांगितले. मात्र, नंतर त्यांना जाण्यास परवानगी देण्यात आली.
अरविंद केजरीवाल हे गुजरातमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभा, रॅली आणि रोड शो करत आहेत. अहमदाबादमध्ये सोमवारी त्यांनी रिक्षा चालकांची भेट घेऊन त्यांच्या समस्यांवर चर्चा केली. यादरम्यान शहरातील घाटलोडिया भागातील रिक्षा चालक विक्रम दंतानी यांनी अरविंद केजरीवाल यांना घरी जेवण करण्याची विनंती केली. विक्रम दंतानी म्हणाले, "मी तुमचा चाहता आहे. मी सोशल मीडियावर पाहिलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पंजाबमधील एका रिक्षा चालकाच्या घरी जेवण करायला गेला होता. मग तुम्ही माझ्या घरी जेवायला याल का?" यावर अरविंद केजरीवाल यांनी होकार दिला आणि ते जेवण करण्यासाठी विक्रम दंतानी यांच्या घरी जाण्यास निघाले. यावेळी पोलिसांनी त्यांना रोखले.
अरविंद केजरीवाल यांच्यासोबत आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते आणि समर्थकांची मोठी फौज होती. अरविंद केजरीवाल यांनी आपण रिक्षा चालकाच्या घरी नक्की जाणार असे सांगताच पोलिसांनी त्यांना तेथे जाण्याची परवानगी दिली. तत्पूर्वी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी गुजरातमधील रिक्षा चालकांना आश्वासन दिले की, त्यांना होणाऱ्या त्रासापासून वाचवण्यासाठी आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) सेवा दारापर्यंत पुरवण्यात येईल.
अरविंद केजरीवाल अहमदाबाद शहरातील ऑटोरिक्षा चालकांच्या मेळाव्याला संबोधित करत होते. यादरम्यान केजरीवाल म्हणाले की, दिल्ली विधानसभा निवडणुकीत त्यांच्या विजयात रिक्षा चालकांची महत्त्वाची भूमिका होती. त्यांनी चालकांना विनंती केली की, दिल्लीप्रमाणे इथेही सोशल मीडियाद्वारे प्रवाशांमध्ये आम आदमी पार्टीचा प्रचार करावा. तसेच, दिल्लीतील आप सरकारने कोविड-19 मुळे लागू केलेल्या लॉकडाऊन दरम्यान सुमारे 1.5 लाख चालकांना दुप्पट पाच हजार रुपये दिले.