"काश्मीर फाइल्स टॅक्स फ्री कशाला? Youtubeवर टाका, फ्री होईल"; केजरीवालांच्या टोल्यानं एकच हशा पिकला!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 06:28 PM2022-03-24T18:28:46+5:302022-03-24T18:29:40+5:30
The Kashmir Files: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ' द काश्मीर फाइल्स' चित्रपट टॅक्स फ्री करण्याच्या मागणीवर प्रतिक्रिया दिली ...
The Kashmir Files: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी 'द काश्मीर फाइल्स' चित्रपट टॅक्स फ्री करण्याच्या मागणीवर प्रतिक्रिया दिली आहे. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान अरविंद केजरीवाल यांनी याबाबत आपलं मत व्यक्त केलं. "भाजपचे लोक काश्मीर फाइल्स चित्रपट करमुक्त करण्याची मागणी करत आहेत. पण जास्तीत जास्त लोकांनी पाहावा यासाठी तुम्ही मागणी करत असाल तर मग दिग्दर्शकांना चित्रपट थेट यूट्यूबवर टाकायला सांगा तिथं लोकांना एकदम फ्री पाहता येईल", असा खोचक टोला अरविंद केजरीवाल यांनी लगावला. त्यानंतर विधानसभेत एकच हशा पिकला. 'आप'च्या आमदारांनी बाकं वाजवून केजरीवालांच्या विधानाला प्रतिसाद दिला.
"काश्मीर फाइल्स चित्रपट तुम्ही टॅक्स फ्री करण्याची मागणी का करत आहात? तुम्हाला एवढंच जर वाटत असेल दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींना सांगा, ते चित्रपट यूट्यूबवर टाकतील. मग सर्व लोकांना फुकट पाहता येईल. करमुक्त करण्याची गरजच काय?", असं केजरीवाल म्हणाले. तसंच काश्मिरी पंडितांच्या नावावर कुणीतरी कोट्यवधींची कमाई करत आहे आणि भाजपावाल्यांना त्यांनी चित्रपटाचे पोस्टर लावण्याचं काम दिलं आहे, असाही टोला केजरीवालांनी लगावला.
BJP wants #TheKashmirFiles to be tax free.
— AAP (@AamAadmiParty) March 24, 2022
Why not ask @vivekagnihotri to upload the whole movie on YouTube for FREE?
-CM @ArvindKejriwalpic.twitter.com/gXsxLmIZ09
अरविंद केजरीवाल यांनी यावेळी भाजप आमदारांनाही 'आप'मध्ये सामील होण्याचं आवाहन केलं. "तुम्ही आमच्यासोबत या. आम्ही तुम्हाला 'द काश्मीर फाइल्स'सारख्या खोट्या चित्रपटांचे पोस्टर लावण्याचं काम देणार नाही. आम्ही तुम्हाला चित्रपटाचं प्रमोशन करायला लावणार नाही. चांगलं काम देऊ, जनतेच्या भल्यासाठीचं काम देऊ", असं केजरीवाल म्हणाले.
भाजपाच्या दिल्ली युनिटचे अध्यक्ष आदर्श गुप्ता यांनी दिल्ली सरकारकडे द काश्मीर फाइल्स चित्रपट करमुक्त करण्याची मागणी केली होती. पण आम आदमी पक्षाकडून चित्रपटक करमुक्त न केल्यानं त्यांनी जोरदार टीका केली होती. "जे लोक भारताचे तुकडे करण्यासंदर्भातल्या जेएनयूमधील घोषणांची पाठराखण करतात, सर्जिकल स्ट्राइकवर शंका उपस्थित करतात आणि भारताच्या गौरवाच्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित करतात अशा लोकांकडून कोणती अपेक्षा ठेवायची?", असा हल्लाबोल आदर्श गुप्ता यांनी केजरीवाल सरकारवर केला होता.