“रामराज्याच्या प्रेरणेनेच सर्वांसाठी काम केले, राम मंदिर ही अभिमानाची बाब”: अरविंद केजरीवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 12:56 PM2024-01-25T12:56:15+5:302024-01-25T12:56:31+5:30

Arvind Kejriwal News: आपण त्याग करण्यापासून मागे हटता कामा नये, अशी शिकवण रामायणातून मिळते, असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.

arvind kejriwal said ram rajya inspiration worked for all in delhi and ram mandir is a matter of pride | “रामराज्याच्या प्रेरणेनेच सर्वांसाठी काम केले, राम मंदिर ही अभिमानाची बाब”: अरविंद केजरीवाल

“रामराज्याच्या प्रेरणेनेच सर्वांसाठी काम केले, राम मंदिर ही अभिमानाची बाब”: अरविंद केजरीवाल

Arvind Kejriwal News: अयोध्येत झालेले राम मंदिर ही अत्यंत अभिमानास्पद अशी गोष्ट आहे. रामराज्याची प्रेरणे घेऊनच दिल्लीत सर्वांसाठी काम केले, असे प्रतिपादन दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केले. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. 

२२ जानेवारीला अयोध्येत रामलला प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. संपूर्ण जगासाठी ही अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे. लोकांनी सर्वत्र खूप आनंद साजरा केला. रामललाचा संदेश आपण आपल्या जीवनात समाविष्ट केला पाहिजे. रामायणाचा उल्लेख करत अरविंद केजरीवाल म्हणाले की, भरत आणि राम यांनी राजपदासाठी संघर्ष केला नाही. पण आजच्या काळात दोन भाऊ राम नामाचा जप करतात आणि भूमीसाठी लढतात. प्रभू रामाने कधीही जातीच्या नावावर भेदभाव केला नाही, असेही केजरीवाल यांनी सांगितले.

त्याग करण्यापासून मागे हटता कामा नये

रामायणाच्या कथेचा संदर्भ देत अरविंद केजरीवाल यांनी सांगितले की, भगवान रामाचा राज्याभिषेक होणार होता. अयोध्येत तयारी पूर्ण झाली होती. प्रभू राम अयोध्येचा राजा होणार याचा अयोध्येतील लोकांना आनंद झाला. अचानक पूर्वसंध्येला प्रभू रामांना संदेश येतो की, दशरथ त्यांना बोलावत आहेत. रामलला खोलीत आल्यावर पाहतात की, दशरथ खूप दुःखी आहे. कैकेयीने दोन अटी घातल्या. एक म्हणजे प्रभू रामाला १४ वर्षे वनवासात जावे लागेल आणि दुसरी म्हणजे भारताला राजा बनवावे लागेल. प्रभू रामाने दशरथाला सांगितले की, आपले वचन पाळले जाईल. कोणत्याही दुःखाशिवाय, चेहऱ्यावर हास्य घेऊन प्रभू रामांनी १४ वर्षांच्या वनवासासाठी अयोध्यो सोडली. हे आपल्याला शिकवते की, आपण त्याग करण्यापासून मागे हटता कामा नये, असे केजरीवाल म्हणाले.

दरम्यान, ५०० वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा आणि न्यायालयीन लढ्यानंतर अखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे लोकार्पण झाले. रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर रामभक्तांनी अयोध्येत मोठी गर्दी केली आहे. राम मंदिर खुले झाल्यानंतर पहिल्या दोन दिवसांत जवळपास साडेसात लाख भाविकांनी रामदर्शन घेतले. एवढेच नव्हे तर राम मंदिराला ३.१७ कोटी रुपयांची देणगी मिळाली.
 

Web Title: arvind kejriwal said ram rajya inspiration worked for all in delhi and ram mandir is a matter of pride

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.