Video - '...तर मी त्यांचा नरकापर्यंत पाठलाग करेन'; अरविंद केजरीवालांचा जोरदार हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 08:22 PM2022-01-12T20:22:48+5:302022-01-12T20:24:55+5:30
Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाब निवडणुकांसाठी आपला अजेंडा जाहीर केला आहे.
नवी दिल्ली - आज आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी पंजाब निवडणुकांसाठी आपला अजेंडा जाहीर केला आहे. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. पंजाब निवडणुकीसाठी आपने उमेदवारीची तिकिटं विकल्याचा आरोप इतर पक्षांकडून केला जात आहे. त्यावर अरविंद केजरीवाल यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच भ्रष्टाचाराविषयी आपली भूमिका स्पष्ट केली. "एकही तिकीट विकलं गेलेलं नाही. जर तुम्ही कोणीही पुराव्यांनिशी सिद्ध करून दाखवू शकलात की अमुक एका व्यक्तीने तिकीट विकलं आणि अमुक एका व्यक्तीने ते खरेदी केलं, तर 24 तासांच्या आत त्याला पक्षातून काढून टाकेन" असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे.
"मी काहीही सहन करू शकतो, पण भ्रष्टाचार सहन करू शकत नाही. जर हे सिद्ध झालं की तिकिटाची खरेदी-विक्री झाली आहे, तर मी त्या दोघांना फक्त पक्षातून निलंबित करून थांबणार नाही, त्यांचा नरकापर्यंत पाठलाग करेन. मी त्यांना सोडणार नाही. जेलमध्ये पाठवेन. सध्या ही फॅशन झाली आहे. सत्याचा मार्ग काट्यांचा असतो. सगळे पक्ष, लोकं आमच्यावर चिखलफेक करत आहेत की तिकिटं विकली. जर कोणी आपवर चुकीचे आरोप केले, तर त्याला देखील आम्ही सोडणार नाही. त्याच्यावरही गुन्हे दाखल करू, त्यांनाही तुरुंगात टाकू. जर तुम्ही सिद्ध केलं की तिकिट खरेदी-विक्री झाली आहे, तर मी त्यांना जेलमध्ये टाकेन. पण इतर कोणी खोटेनाटे आरोप केले, तर त्यांनाही जेलमध्ये टाकेन. त्यांना सोडणार नाही" असंही केजरीवाल यांनी म्हटलं आहे.
मैं कुछ भी बर्दाश्त कर सकता हूँ, भ्रष्टाचार बर्दाश्त नहीं कर सकता!
— AAP (@AamAadmiParty) January 12, 2022
किसी ने Ticket बेची है तो साबित करो। मैं उनका जहन्नुम तक पीछा करूंगा, उन्हें Jail भेजूंगा, छोडूंगा नहीं।🔥
- श्री @ArvindKejriwalpic.twitter.com/13J6t6ih33
दिल्ली महापालिकांची निवडणूक काही महिन्यांवर आली असताना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सॉफ्ट हिंदुत्वाचा फॉर्म्युला अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीत होम क्वारंटाइन असलेल्या 40 हजार कोरोनाबाधितांना योग व प्राणायामाचे मोफत ऑनलाइन वर्ग आयोजित केले जाणार आहेत. यासंदर्भात केजरीवाल यांनी घोषणा केली असून, योग व प्राणायमामुळे शरीरातील प्रतिकारशक्ती वाढत असल्याचा दावा केला आहे.
केजरीवालांचा पुन्हा सॉफ्ट हिंदुत्वाचा फॉर्म्युला
दिल्लीतील नागरिकांच्या भल्यासाठी हा निर्णय घेतला आहे. लोकांना योग व प्राणायमाचा निश्चितपणे फायदा होईल, असा दावा त्यांनी केला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी हनुमान चालिसा पठणाचा कार्यक्रम राबविला होता. याचा राजकीय फायदा आम आदमी पार्टीला मिळाल्याचे बोलले जाते. त्यावेळी सॉफ्ट हिंदुत्वाचा आरोप मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या राजकीय विरोधकांनी केला होता.