Arvind Kejriwal : "पंतप्रधान मोदी अहंकारी झालेत, स्वतःला घोषित केलं 'देव'"; अरविंद केजरीवालांचा खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 02:50 PM2024-05-31T14:50:43+5:302024-05-31T15:04:19+5:30
Arvind Kejriwal And Narendra Modi : अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. "मोदी अहंकारी झाले आहेत. त्यांनी स्वत:च स्वतःला देव घोषित केलं आहे" असं म्हणत खोचक टोला लगावला आहे. एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत केजरीवालांनी असं म्हटलं आहे. इंडिया आघाडीसाठी प्रचार केला, याचा काही फायदा होईल का? असा प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री म्हणाले, "गीतेत लिहिलं आहे की, काम करा, फळाची चिंता करू नये. मी प्रचार केला आहे. त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे."
पंतप्रधान मोदी महागाईवर बोलत नसल्याचा आरोप दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी केला. "जनतेमध्ये भाजपबद्दल नाराजी आहे. महागाई आणि बेरोजगारीमुळे जनता हैराण झाली आहे. लोकांचा भाजपाबद्दल भ्रमनिरास झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या विषयांवर बोलले नाहीत, उलट ते दोन महिन्यांपासून इकडच्या-तिकडच्या विषयावर बोलत आहेत. ते महाराष्ट्रात शरद पवारांना भटकणारा आत्मा म्हणतात, तर उद्धव ठाकरेंना बाळासाहेब ठाकरेंचा 'नकली संतान' म्हणतात. या मुद्द्यांवर जनता त्यांना मत देईल का?"
"पंतप्रधान मोदी अहंकारी झाले आहेत"
"पंतप्रधान मोदी आजकाल अहंकारी झाले आहेत. ते म्हणतात की, ते आईच्या उदरातून जन्माला आलेले नसून ते देवाचा अवतार आहेत. त्यांनी स्वत:च स्वतःला देव घोषित केलं आहे. पंतप्रधान मोदींनी २०१४ मध्ये स्वतःला प्रधान सेवक म्हटलं, नंतर २०१९ मध्ये स्वतःला चौकीदार म्हटलं आणि आता २०२४ मध्ये स्वतःला देव घोषित केलं आहे" असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.
"अमित शाह यांच्या धमकीला जनताच उत्तर देईल"
पंजाबमध्ये भगवंत मान यांच्या जागी राघव चढ्ढा यांना मुख्यमंत्री बनवण्याची चर्चा सुरू आहे? या प्रश्नाला उत्तर देताना केजरीवाल म्हणाले की, "गृहमंत्री अमित शाह अशा गोष्टी बोलत आहेत. त्यांनी पंजाबमध्ये जाऊन ४ जून रोजी सरकार पाडून भगवंत मान यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवणार असल्याचं सांगितलं. ७५ वर्षात कोणत्याही गृहमंत्र्यांनी असं विधान केलं असा तुम्ही विचार तरी करू शकता का? अमित शाह यांच्या धमकीला जनताच १ जूनला उत्तर देईल."