40च्या बदल्यात 400 मारा, तरच पूर्ण होईल पुलवामाचा बदला - अरविंद केजरीवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2019 02:14 PM2019-02-25T14:14:36+5:302019-02-25T14:17:00+5:30
ते आमचे 40 मारतात, तर आम्ही त्यांचे 400 मारले पाहिजेत. तरच पाकिस्तान आपल्यासोबत बरोबरीची भाषा करेल. नाहीतर आपल्याला कमजोर समजेल, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल एक मार्चपासून दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा, या मागणीसाठी आमरण उपोषण करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी पाकिस्तानवर हल्लाबोल केला. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर निशाणा साधला.
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यावरुन भाजपा राजकारण करत असल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. पाकिस्तानच्या विरोधात आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत आहोत. मात्र, सत्ताधारी भाजपाने पाकिस्तानला धडा शिवकण्यासाठी कठोर पाऊले उचलली पाहिजे. सतत भारताचा अपमान होत आहे. सीमेवर पाकिस्तान जे हवे आहे, ते करत आहे, असे अरविंद केजरीवाल म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने पाकिस्तानच्या बाबतीत चुकीचा मेसेज देण्याचे काम केले आहे. पंतप्रधान निमंत्रण नसताना नवाज शरीफ यांच्या वाढदिवसाला पाकिस्तानला गेले होते. त्यामुळे पाकिस्ताने आपल्याला कमजोर समजले. दुसरे म्हणजे, पठाणकोटमध्ये आम्ही आयएसआयला चौकशीसाठी बोलविले. मात्र, त्यांच्याच दहशतवाद्यांनी एअरबेसवर हल्ला केला होता. ते आमचे 40 मारतात, तर आम्ही त्यांचे 400 मारले पाहिजेत. तरच पाकिस्तान आपल्यासोबत बरोबरीची भाषा करेल. नाहीतर आपल्याला कमजोर समजेल, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.