Arvind Kejriwal: "आम्ही नवा भारत घडवू, ज्यात विद्यार्थ्यांना युक्रेनला जावं लागणार नाही"; अरविंद केजरीवालांचं विधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2022 04:51 PM2022-03-10T16:51:15+5:302022-03-10T16:51:43+5:30
Punjab Assembly 2022: पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी पंजाबच्या जनतेचे आभार व्यक्त करताना मोठं विधान केलं आहे.
Punjab Assembly 2022: पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी पंजाबच्या जनतेचे आभार व्यक्त करताना मोठं विधान केलं आहे. पंजाबमध्ये आपनं बहुमताचा आकडा गाठला असून ११७ जागांपैकी तब्बल ९२ जागांवर आपचे उमेदवार आघाडीवर आहेत. पंजाब काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना या निवडणूकीत पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. दिल्लीस्थित आम आदमी पक्षाचा कार्यालयातून संबोधित करताना केजरीवालांनी पंजाबच्या जनतेनं आज कमाल करुन दाखवल्याचं म्हटलं.
"पंजाबच्या जनतेनं आज कमाल केली आहे. आम्ही देशाची प्रस्थापित व्यवस्था बदलण्याचं काम केलं आहे. आता आम्हा नवा भारत घडवू ज्यात विद्यार्थ्यांना युक्रेनला जाण्याची गरज भासणार नाही. पंजाबमध्ये काँग्रेसच्या दिग्गजांना आज सर्वसामान्य जनतेचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या आपच्या उमेदवारांनी पराभूत केलं आहे. मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांना तर एका मोबाइल रिपेअर करणाऱ्यानं पराभूत केलं. ज्याची आई एका शाळेत साफसफाईचं काम करते. हा एका सर्वसामान्य महिलेचा विजय आहे. पंजाबच्या निकालांनी जनतेनं दाखवून दिलंय की केजरीवाल दहशतवादी नव्हे, तर एक देशभक्त आहे", असं केजरीवाल म्हणाले.
खुर्च्या जागेवर राहणार नाहीत- केजरीवाल
"आम्ही इमानदारीचं राजकारण सुरू केलं आहे. लोकांचं काम करणारा आमचा पक्ष आहे. आम्हाला रोखणं आता इतकं सोपं राहिलेलं नाही. पंजाबमध्ये खूप मोठमोठी षडयंत्र रचली गेली. सर्वजण आपच्या विरुद्ध एकत्र झाले होते. अखेरीस केजरीवाल दहशतवादी असल्याचं ते बोलू लागले. पण मी आजही सांगतो आम आदमीला आव्हान देऊ नका. एक सर्वसामान्य माणूस सत्ताधाऱ्यांची खूर्ची हिसकावून घेण्याचं काम करू शकतो", असं केजरीवाल म्हणाले.