Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आजही ईडीसमोर होणार नाहीत हजर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2024 10:08 AM2024-02-02T10:08:13+5:302024-02-02T10:26:08+5:30
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल आजही ईडीसमोर हजर होणार नाहीत. केजरीवाल यांनी ईडीच्या समन्सकडे दुर्लक्ष करण्याची ही पाचवी वेळ आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आजही ईडीसमोर हजर होणार नाहीत. केजरीवाल यांनी ईडीच्या समन्सकडे दुर्लक्ष करण्याची ही पाचवी वेळ आहे. आम आदमी पार्टीने या संदर्भात एक निवेदन जारी करून म्हटलं आहे की, ईडीचे समन्स बेकायदेशीर आहे. तसेच ईडीच्या समन्सवरून केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
"केजरीवाल यांना अटक करून ते दिल्लीतील सरकार पाडू इच्छित आहेत. आम्ही हे कधीच होऊ देणार नाही" असं आम आदमी पार्टीने म्हटलं आहे. यापूर्वी, ईडीने 17 जानेवारी, 3 जानेवारी, 21 डिसेंबर आणि 2 नोव्हेंबर रोजी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना समन्स पाठवले होते, परंतु ते हजर झाले नाहीत.
ईडीने सातत्याने समन्स जारी केल्यानंतर आम आदमी पार्टीने दावा केला होता की, ही सर्व प्रक्रिया अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यासाठी केली जात आहे. ईडी त्याला चौकशीच्या बहाण्याने बोलावून अटक करू इच्छित आहे. जर ईडीला चौकशी करायची असेल तर ते आपले प्रश्न लिहून केजरीवाल यांना देऊ शकतात असं आपने म्हटलं आहे.
"दिल्ली के मुख्यमंत्री और AAP के राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल आज भी ईडी के सामने पेश नहीं होंगे। पार्टी ने समन को "गैरकानूनी" बताया है। हम वैध समन का पालन करेंगे। पीएम मोदी का लक्ष्य अरविंद केजरीवाल को गिरफ्तार करना और दिल्ली सरकार को गिराना है। हम ऐसा नहीं होने देंगे: आम… pic.twitter.com/7qbmJlq0Gk
— ANI_HindiNews (@AHindinews) February 2, 2024
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांना समन्स का पाठवले आहेत? असा सवाल उपस्थित केला. "दोन वर्षांपासून तपास सुरू आहे, तर लोकसभा निवडणुकीपूर्वीच का बोलावले जात आहे? सीबीआयने 8 महिन्यांपूर्वी फोन केला होता. मी पण जाऊन उत्तरे दिली होती."
"आता लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांना बोलावले जात असल्याने माझी चौकशी करणे हा त्यांचा उद्देश नाही. ते लोक मला फोन करून अटक करू इच्छितात. जेणेकरून मी प्रचार करू शकत नाही. आज भाजपा नेत्यांना पक्षात समाविष्ट करण्यासाठी ईडी आणि सीबीआयचा वापर करत आहे" असं केजरीवालांनी म्हटलं आहे.