चौथी पास राजाने मित्रासोबत मिळून देशाला लुटले; CM केजरीवालांनी विधानसभेच ऐकवली गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2023 06:10 PM2023-04-17T18:10:04+5:302023-04-17T18:11:02+5:30
Arvind Kejriwal in Delhi Assembly: 'अशिक्षित राजाने बनावट पदवी मिळवली, तो स्वतःला एमए पास म्हणू लागला.'
नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल(Arvind Kejriwal) यांनी विधानसभेच्या अधिवेशनात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर(Narendra Modi) जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी एका चौथी पासच्या राजाची गोष्ट सांगितली. ते म्हणाले की, 'राजाने एमएच्या बनावट पदव्या मिळवल्या. आरटीआयद्वारे याबाबत माहिती मागवली असता, त्याने 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला.' केजरीवाल यांनी या गोष्टीतून पंतप्रधान मोदींचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला.
पीएम मोदींवर गंभीर टीका
अरविंद केजरीवाल म्हणाले की, 'मी आता एका अशिक्षित राजाची गोष्ट सांगणार आहे. तो राजा चौथी पास होता, पण त्याच्यात खूप अहंकार होता. राजा खूप भ्रष्ट होता. त्याला पैशाची खूप भूक लागली होती. त्या राजाला भाषणे करायची खूप आवड होती. अशिक्षित असल्याने राजाने अनेक फाईल्सवर सह्या केल्या. लोक राजाला कमी शिकलेला म्हणून टोमणे मारायचे, म्हणून त्याने बनावट पदवी मिळवली. तो स्वतःला एमए पास म्हणू लागला.'
एक चौथी पास राजा की कहानी… https://t.co/tUirANQive
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) April 17, 2023
'आधी नोटाबंदी, नंतर तीन काळे कायदे केले'
अरविंद केजरीवाल यांनी यावेळी नोटाबंदीचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, 'एके दिवशी रात्री 8 वाजता राजाने सर्व चलनी नोटा बंद केल्या. या घटनेने संपूर्ण देशात खळबळ उडाली. लोकांचे व्यवसाय उद्ध्वस्त झाले, लोकांचा रोजगार गेला. राजाने आपल्या मूर्खपणामुळे तीन काळे कायदेही आणले. त्यामुळे देशभरातील शेतकरी रस्त्यावर आले.'
'राजाने देशाला प्रचंड लुटले'
'चौथी पास राजाने आपल्या मित्रासह देशाला प्रचंड लुटले. आपल्या मित्राला सरकारी कंत्राटे मिळवून दिली. राजाने मित्रासोबत देशाची प्रचंड लूट केली. देशातील बँका प्रथम लुटल्या गेल्या. त्याने त्याच्या मित्राला खूप कर्ज मिळवून दिले. राजाने आपल्या मित्राला लाखो कोटींचे कर्ज दिले. दोघांनी मिळून सरकारी मालमत्तेचा ताबा घेतला,' असे केजरीवाल म्हणाले. त्यांच्या या गोष्टीनंतर विधानसभेत एकच हशा पिकला.