Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 04:18 PM2024-05-11T16:18:58+5:302024-05-11T16:34:20+5:30
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांनी तिहार तुरुंगातून बाहेर आल्यानंतर शनिवारी प्रथमच जाहीर सभेला संबोधित करताना केंद्र आणि भाजपा सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी 10 मे 2024 रोजी तिहार तुरुंगातून बाहेर आल्यानंतर शनिवारी प्रथमच जाहीर सभेला संबोधित करताना केंद्र आणि भाजपा सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "तुमच्या सर्वांमध्ये परत आल्याने मला खूप आनंद होत आहे. सर्वांनी मिळून आपल्या देशाला हुकूमशाहीपासून वाचवायचं आहे. मी माझ्या सर्व ताकदीने लढेन. मला देशातील 140 कोटी जनतेच्या पाठिंब्याची गरज आहे."
"पंतप्रधान म्हणतात, मी भ्रष्टाचाराशी लढत आहे. देशातील मोठमोठे चोर, भ्रष्टाचारी यांना त्यांनी आपल्या पक्षात सामावून घेतलं. मला त्यांना सांगायचं आहे की, जर तुम्हाला भ्रष्टाचाराविरुद्ध लढायचे असेल तर तुम्ही माझ्याकडून शिका. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता एक नवीन मिशन सुरू केलं आहे. 'वन नेशन वन लीडर' हे त्यांचं ध्येय आहे. मोदी हे मिशन एका निश्चित रणनीतीनुसार राबवत आहेत. या रणनीतीनुसार भाजपाच्या सर्व विरोधी नेत्यांना संपवायचं आहे."
आप सब लोगों के बीच वापस लौट कर मुझे बेहद ख़ुशी हो रही है। हमें मिलकर अपने देश को तानाशाही से बचाना है, मैं अपनी पूरी ताक़त से लड़ूँगा, मुझे देश के 140 करोड़ लोगों का समर्थन चाहिए। https://t.co/QbUWA5dBHF
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) May 11, 2024
"भाजपा सरकारला त्यांना तुरुंगात पाठवायचं आहे. त्यांनी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना तुरुंगात पाठवलं. आता त्यांना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना तुरुंगात पाठवायचं आहे. दिल्ली सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन, मनीष सिसोदिया, संजय सिंह यांच्यासह अनेक मंत्र्यांना तुरुंगात पाठवण्यात आलं" असं म्हणत केजरीवाल यांनी टीकास्त्र सोडलं आहे.
"येत्या काही दिवसांत ते तेजस्वी यादव, पी विजयन यांसारख्या नेत्यांना तुरुंगात पाठवतील. त्याचप्रमाणे त्यांना एक एक करून सर्वांना घाबरवायचं आहे. मी या हुकूमशाहीशी लढेन - मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा. मित्रांनो, ही पंतप्रधान मोदींची हुकूमशाही आहे. पंतप्रधान मोदींना हे देशावर लादायचं आहे. संविधान वाचवण्यासाठी आता केंद्र सरकारला सत्तेतून बेदखल करण्याची गरज आहे" असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.