Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल कोरोना पॉझिटिव्ह; संपर्कात आलेल्यांना चाचणी करण्याचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2022 09:21 AM2022-01-04T09:21:03+5:302022-01-04T09:22:23+5:30
Arvind Kejriwal tests COVID-19 positive : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्वत: याबद्दल माहिती दिली आहे.
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली. यासोबतच अरविंद केजरीवाल यांनी संपर्कात येणाऱ्या लोकांना स्वतःला विलगीकरण आणि चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्वत: याबद्दल माहिती दिली आहे. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह असून, सौम्य लक्षणं आहेत. स्वत:ला घरातच विलगीकरणात ठेवले आहे. गेल्या काही दिवसांत जे माझ्या संपर्कात आले, त्यांनीही कृपया स्वतःला विलगीकरणात राहावे आणि स्वतःची चाचणी करून घ्यावी, असे आवाहन अरविंद केजरीवाल यांनी केले आहे.
I have tested positive for Covid. Mild symptoms. Have isolated myself at home. Those who came in touch wid me in last few days, kindly isolate urself and get urself tested
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) January 4, 2022
दरम्यान, कोरोना व्हायरसची तिसरी लाट आणि ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या (Omicron) पार्श्वभूमीवर देशात सध्या कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण दिल्ली आणि महाराष्ट्रात असल्याचे समोर आले आहे. दिल्लीत सोमवारी कोरोना कोरोना संसर्गाची 4,099 नवीन प्रकरणे नोंदवली गेली, जी रविवारच्या तुलनेत 28 टक्के अधिक आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, दिल्लीत गेल्या 24 तासांत कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला, तर संसर्गाचे प्रमाण 6.46 टक्क्यांवर पोहोचले आहे.
दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या 'ग्रेडेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅन' अंतर्गत, लागोपाठ दोन दिवस संसर्गाचे प्रमाण पाच टक्क्यांपेक्षा जास्त राहिल्यास 'रेड अलर्ट' स्थिती निर्माण होईल, ज्या अंतर्गत कर्फ्यू लागू करण्यासोबत बहुतेक आर्थिक घडामोडी ठप्प होतील. गेल्या रविवारी दिल्लीत संसर्गाची 3,194 प्रकरणे नोंदवली गेली आणि संसर्ग दर 4.59 टक्के होता, तर शनिवारी संसर्गाची 2,716 प्रकरणे नोंदवली गेली आणि संसर्ग दर 3.6 टक्के होता. त्याचप्रमाणे, शुक्रवार आणि गुरुवारी, अनुक्रमे 1,796 आणि 1,313 प्रकरणे नोंदवली गेली आणि संसर्ग दर 1.73 टक्के आणि 2.44 टक्के होता.