अरविंद केजरीवालांनी राजीनामा दिल्यास दिल्लीचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? 'ही' ५ नावं आघाडीवर...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2024 02:24 PM2024-09-15T14:24:34+5:302024-09-15T14:39:41+5:30
Who will be next Delhi CM? राजकीय वर्तुळात दिल्लीचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार? असा सवाल उपस्थित होत आहे.
Who Will Become New CM of Delhi? : नवी दिल्ली : दोन दिवसांपूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळ्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला. यानंतर आज अरविंद केजरीवाल यांनी पुढील २ दिवसांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. जामिनावर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील आप आदमी पार्टीच्या (आप) मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी, दोन दिवसांनी मी मुख्यमंत्रीपद सोडणार आहे. निवडणुकीनंतर मी मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसेन, माझ्या जागी दुसरे मुख्यमंत्री असतील, असे अरविंद केजरीवाल म्हणाले.
यानंतर आता राजकीय वर्तुळात दिल्लीचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार? असा सवाल उपस्थित होत आहे. कार्यकर्त्यांना संबोधित करताना अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केले की, दिल्लीचा नवा मुख्यमंत्री कोण होणार, याबाबातचा निर्णय विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत घेतला जाईल. तसेच, मनीष सिसोदिया हे निवडणूक होईपर्यंत कोणतेही पद घेणार नसल्याचेही अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केले. याचा अर्थ मनीष सिसोदिया हे देखील मुख्यमंत्री होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत 'ही' पाच नावं
अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर राखी बिर्ला यांचे नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे. राखी बिर्ला या अनुसूचित जातीचा चेहरा असून मागासवर्गीयांना लक्षात घेऊन त्यांना खुर्ची दिली जाऊ शकते. याशिवाय, दिल्ली सरकारच्या मंत्री आतिशी मार्लेना यांचेही नाव पुढे जात आहे. १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करण्यासाठी अरविंद केजरीवाल यांनी आतिशी यांचे नाव पुढे केले होते. मात्र ते नाकारण्यात आले.
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतील तिसरे नाव सौरभ भारद्वाज आहे. सौरभ भारद्वाज हे पक्षाचे प्रवक्ते आहेत आणि अरविंद केजरीवाल तुरुंगात गेल्यानंतर त्यांनी सरकारच्या कामाची जबाबदारी स्वीकारली होती. दिल्लीचे परिवहन आणि पर्यावरण मंत्री कैलाश गेहलोत यांचेही नाव मुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत आहे. याशिवाय अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांचेही नाव चर्चेत आहे. तर अरविंद केजरीवाल यांना त्यांच्या पत्नीला मुख्यमंत्री बनवायचे आहे, असा दावाही भाजप करत आहे.
काय म्हणाले अरविंद केजरीवाल?
आज मी तुमच्यामध्ये आलो आहे. मी जनतेच्या दरबारात आलो आहे. मी तुम्हाला हे विचारायला आलो आहे की तुम्ही केजरीवाल यांना प्रामाणिक मानता की गुन्हेगार… मला दिल्ली आणि देशातील जनतेला विचारायचे आहे की केजरीवाल प्रामाणिक आहेत की गुन्हेगार? मित्रांनो, मी दोन दिवसांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला तुरुंगाच्या आतून सरकार का चालवता येत नाही, असा सवाल केला, तर आम्ही सरकार चालवू शकतो हे सिद्ध केले आहे. मी सर्व गैर-भाजप मुख्यमंत्र्यांना आवाहन करतो की, तुम्हाला अटक करण्याचा प्रयत्न झाला तर घाबरू नका. आम आदमी पक्षाने त्यांचा नवा फॉर्म्युला फेल केला आहे. त्यांच्या सर्व कारस्थानांचा मुकाबला करण्याची ताकद आज आम आदमी पक्षाकडे आहे कारण आपण प्रामाणिक आहोत. ते आमच्या प्रामाणिकपणाला घाबरतात, कारण ते अप्रामाणिक आहेत. देशातील जनतेला मी बेईमान वाटत असेल तर मी एक मिनिटही खुर्चीवर बसणार नाही, खुर्ची सोडेन. त्यांनी माझ्यावर पीएमएलए या देशातील सर्वात कठोर कायद्यानुसार आरोप लावले. पण मला कोर्टातून जामीन मिळाला. मी न्यायालयाचा खूप आभारी आहोत. माझी निर्दोष मुक्तता होईपर्यंत मी खुर्चीवर बसणार नाही, असे अरविंद केजरीवाल म्हणाले.
महाराष्ट्रासोबत निवडणुका घ्या- केजरीवाल
जोपर्यंत जनता निकाल देत नाही तोपर्यंत मी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणार नाही. तुम्ही तुमचा निर्णय द्याल तेव्हा मी त्या खुर्चीवर जाऊन बसेन. तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी आता हे का बोलत आहे, त्यांनी माझ्यावर आरोप केला आहे की केजरीवाल चोर आहेत, भ्रष्ट आहेत, मी या कामासाठी आलो नाही. प्रभू राम १४ वर्षांनी वनवासातून परतले तेव्हा माता सीतेला अग्नीपरीक्षा सहन करावी लागली. आज मी तुरुंगातून परतलो आहे, मला अग्निपरीक्षा पार करावी लागणार आहे. फेब्रुवारीमध्ये निवडणुका आहेत. या निवडणुका महाराष्ट्रासह नोव्हेंबरमध्ये व्हाव्यात, अशी माझी मागणी आहे. जोपर्यंत तुमचा निर्णय येत नाही तोपर्यंत मी जबाबदारी स्वीकारणार नाही आणि जोपर्यंत निवडणूक होत नाही तोपर्यंत माझ्या जागी आम आदमी पक्षाचा कोणीतरी मुख्यमंत्री होईल. विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत पुढील नाव निश्चित होणार आहे. मनीष सिसोदिया हे देखील स्वतःची काळजी तेव्हाच घेतील जेव्हा दिल्लीची जनता प्रामाणिक आहे असे म्हणेल. आम्ही दोघे तुमच्यामध्ये येऊ. तुम्ही प्रामाणिक आहात, असे जनतेने सांगितले तर आम्ही या खुर्चीवर बसू. आज मी तुमच्यामध्ये आलो आहे, जर मी प्रामाणिक असेल तर मतदान करा, नाहीतर मत देऊ नका, असे आवाहन अरविंद केजरीवाल यांनी केले.