अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 07:28 PM2024-09-28T19:28:40+5:302024-09-28T19:29:43+5:30
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल लवकरच दिल्लीतील सिव्हिल लाईन भागातील मुख्यमंत्री निवासस्थान रिकामे करणार आहेत.
नवी दिल्ली : आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल लवकरच दिल्लीतील सिव्हिल लाईन भागातील मुख्यमंत्री निवासस्थान रिकामे करणार आहेत. आम आदमी पार्टीने शनिवारी (२८ सप्टेंबर) सांगितले की, माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघाच्या आसपास निवासस्थान शोधत आहेत. या मतदारसंघातील ते आमदार देखील आहेत.
एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, अरविंद केजरीवाल यांच्या नवी दिल्ली मतदारसंघाजवळ नवीन निवासस्थान शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच, अरविंद केजरीवाल हे लवकरच मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार आहेत, त्यामुळे नवीन निवासस्थानाचा शोध सुरू करण्यात आला आहे, असे आम आदमी पार्टीने म्हटले आहे.
आम आदमी पार्टीने एका निवेदनात म्हटले आहे की, अरविंद केजरीवाल लोकांशी संपर्कात राहण्यासाठी नवी दिल्लीजवळ राहणे पसंत करत आहेत. नवी दिल्लीमधून ते आमदार आहेत. अनेक आमदार, नगरसेवक, पक्षाचे कार्यकर्ते आणि सामान्य लोक आम आदमी पार्टीच्या प्रमुखांना घर देऊ करत आहेत. मात्र, अरविंद केजरीवाल अशी जागा शोधत आहेत, जी वादमुक्त असेल आणि तिथे राहण्यास कोणतीही अडचण येणार नाही.
अबकारी धोरणाच्या प्रकरणी तिहार तुरुंगातून सुटका झाल्यानंतर १७ सप्टेंबर रोजी अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्लीचे एलजी व्हीके सक्सेना यांच्याकडे सोपवला होता. यानंतर आम आदमी पार्टीकडून सर्व आमदारांच्या संमतीने आतिशी यांना मुख्यमंत्री करण्यात आले. आतिशी यांनी २२ सप्टेंबर रोजी दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
दरम्यान, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचे घोषित करताना अरविंद केजरीवाल यांनी म्हटले होते की, जेव्हा त्यांना फेब्रुवारी २०२५ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत नवीन जनादेश मिळेल आणि दिल्लीच्या लोकांकडून ईमानदारीचे सर्टिफिकेट मिळेल, तेव्हाच ते मुख्यमंत्रिपदावर परत येतील.