के. चंद्रशेखर राव यांच्या स्वप्नांना केजरीवालांनी लावला सुरुंग

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 08:04 AM2022-03-10T08:04:56+5:302022-03-10T08:05:06+5:30

तेलंगणमध्ये ‘छोटा मोदी’ म्हणून ओळखले जात असल्याचा केला वार

arvind Kejriwal undermines Chandrasekhar Rao's dreams | के. चंद्रशेखर राव यांच्या स्वप्नांना केजरीवालांनी लावला सुरुंग

के. चंद्रशेखर राव यांच्या स्वप्नांना केजरीवालांनी लावला सुरुंग

Next

- हरीश गुप्ता
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : तिसऱ्या आघाडीचा उदयोन्मुख नेता बनण्याचे तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे स्वप्न आम आदमी पक्षाने (आप) ‘छोटा मोदी’ अशा शब्दांत वर्णन करून उधळून लावले आहे. आपच्या तेलंगणच्या प्रभारींनी अत्यंत कठोर शब्दांत जारी केलेल्या निवेदनात राव यांच्या सरकारने सरकारी नोकऱ्या त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना वितरित केल्या आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेचे नुकसान होण्यासाठी सर्व काही केले, असा आरोप केला.

के. सी. राव यांनी आपचे निमंत्रक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत मुक्काम केला होता. ही भेट होती विरोधकांची एकजूट करण्यासाठी; परंतु केजरीवाल यांनी ‘मी दिल्लीत नाही,’ असे कारण सांगून भेटीस नकार दिला.
राव हे २०२४ मधील लोकसभा निवडणूक भाजपविरोधात लढण्यासाठी संयुक्त आघाडी स्थापन करण्याकरिता राज्यांच्या नेत्यांची भेट घेत असतात. या नेत्यांमध्ये काँग्रेसचा समावेश नसतो.

आपचे दिल्लीतील आमदार सोमनाथ भारती हे तेलंगणचे प्रभारी आहेत. ते म्हणाले, ‘केसीआर हे तेलंगणमध्ये ‘छोटा मोदी’ म्हणून परिचित आहेत. राव यांचा उद्धटपणाच केवळ त्यांच्या दाव्याला दुजोरा देतो. तेलंगण राष्ट्र समिती तेलंगणमध्ये फार मोठ्या प्रमाणावर अपयशी ठरली आहे. केसीआर साहेब हे तेलंगणमध्ये छोटा मोदी म्हणून माहीत आहेत.’

के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन आणि इतर नेत्यांची भेट घेतली; परंतु त्या बोलण्यातून काहीही निष्पन्न झालेले नाही; कारण निवडणूक लांब आहे. 

Web Title: arvind Kejriwal undermines Chandrasekhar Rao's dreams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.