'लालू-राबडी मॉडलचे अनुकरण; केजरीवालांना पत्नीला मुख्यमंत्री बनवायचेय', भाजपचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2024 07:49 PM2024-09-15T19:49:02+5:302024-09-15T19:49:38+5:30

Arvind Kejriwal: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे.

'Arvind Kejriwal wants to make his wife Chief Minister, BJP attack | 'लालू-राबडी मॉडलचे अनुकरण; केजरीवालांना पत्नीला मुख्यमंत्री बनवायचेय', भाजपचा हल्लाबोल

'लालू-राबडी मॉडलचे अनुकरण; केजरीवालांना पत्नीला मुख्यमंत्री बनवायचेय', भाजपचा हल्लाबोल

BJP On Arvind Kejriwal : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दोन दिवसांपूर्वी दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला. त्यानंतर आता आज(दि.15) त्यांनी राजीनाम्याची घोषणा केली आहे. पुढील दोन दिवसांनी केजरीवाल आपल्या पदाचा राजीनामा देणार असून, नवीन मुख्यमंत्र्यांची निवड केली जाणार आहे. दरम्यान, केजरीवालांच्या राजीनाम्यावर भाजपने हल्लाबोल केला आहे. अरविंद केजरीवाल यांना त्यांची पत्नी सुनीता केजरीवाल यांना मुख्यमंत्री बनवायचे आहे, असा आरोप भाजप नेते शेहजाद पूनावाला यांनी केला आहे.

भाजप नेते शेहजाद पूनावाला म्हणाले, "आमच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा देण्यासाठी दोन दिवसांचा अवधी मागितला आहे. याचे कारण म्हणजे, त्यांना त्यांच्या आमदारांवर सुनीता केजरीवाल यांना पुढील मुख्यमंत्री म्हणून स्वीकारण्यास दबाव टाकायचा आहे. लालू-राबरी मॉडेल, सोनिया-मनमोहन मॉडेलप्रमाणे केजरीवालांना संपूर्ण सत्ता हवी, पण जबाबदारी नकोय. माझ्या ट्विट आणि वक्तव्यानंतर आम आदमी पार्टी मागे हटण्याची शक्यता आहे."

"अरविंद केजरीवाल यांनी आपत्तीमध्ये संधी शोधण्यात पीएचडी केली आहे. न्यायालयाने त्यांना अबकारी धोरण घोटाळा प्रकरणात निर्दोष मुक्त केले नाही, परंतु त्यांना सशर्त जामीन दिला. ते राजीनामा देण्याचे नाटक करत आहेत," अशी टीकाही शेहजाद पूनावाला यांनी यावेळी केली. 

अरविंद केजरीवाल काय म्हणाले?
कथित मद्य घोटाळ्यात जामीन मिळाल्यानंतर दोन दिवसांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पक्ष कार्यालयात पोहोचले. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना राजीनाम्याची घोषणा केली. दोन दिवसांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याचे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. मी प्रामाणिक आहे असे तुम्हाला वाटत असेल तर मला मत द्या, असेही ते म्हणाले. "आज मी तुमच्यामध्ये आलो आहे. मी जनतेच्या दरबारात आलो आहे. मी तुम्हाला हे विचारायला आलो आहे की तुम्ही केजरीवाल यांना प्रामाणिक मानता की गुन्हेगार? मला दिल्ली आणि देशातील जनतेला विचारायचे आहे की, केजरीवाल प्रामाणिक आहेत की गुन्हेगार? मित्रांनो, मी दोन दिवसांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने केंद्र सरकारला तुरुंगाच्या आतून सरकार का चालवता येत नाही, असा सवाल केला, तर आम्ही सरकार चालवू शकतो हे सिद्ध केले आहे. मी सर्व गैर-भाजप मुख्यमंत्र्यांना आवाहन करतो की, तुम्हाला अटक करण्याचा प्रयत्न झाला तर घाबरू नका. आम आदमी पक्षाने त्यांचा नवा फॉर्म्युला फेल केला आहे. त्यांच्या सर्व कारस्थानांचा मुकाबला करण्याची ताकद आज आम आदमी पक्षाकडे आहे कारण आपण प्रामाणिक आहोत. ते आमच्या प्रामाणिकपणाला घाबरतात, कारण ते अप्रामाणिक आहेत. देशातील जनतेला मी बेईमान वाटत असेल तर मी एक मिनिटही खुर्चीवर बसणार नाही, खुर्ची सोडेन. त्यांनी माझ्यावर पीएमएलए या देशातील सर्वात कठोर कायद्यानुसार आरोप लावले. पण मला कोर्टातून जामीन मिळाला. मी न्यायालयाचा खूप आभारी आहोत. माझी निर्दोष मुक्तता होईपर्यंत मी खुर्चीवर बसणार नाही, असे माझे मन सांगत आहे," असं अरविंद केजरीवाल म्हणाले.

"जोपर्यंत जनता निकाल देत नाही तोपर्यंत मी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणार नाही. तुम्ही तुमचा निर्णय द्याल तेव्हा मी त्या खुर्चीवर जाऊन बसेन. तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी आता हे का बोलत आहे, त्यांनी माझ्यावर आरोप केला आहे की केजरीवाल चोर आहेत, भ्रष्ट आहेत, मी या कामासाठी आलो नाही. प्रभू राम १४ वर्षांनी वनवासातून परतले तेव्हा माता सीतेला अग्नीपरीक्षा सहन करावी लागली. आज मी तुरुंगातून परतलो आहे, मला अग्निपरीक्षा पार करावी लागणार आहे. फेब्रुवारीमध्ये निवडणुका आहेत. या निवडणुका महाराष्ट्रासह नोव्हेंबरमध्ये व्हाव्यात, अशी माझी मागणी आहे. जोपर्यंत तुमचा निर्णय येत नाही तोपर्यंत मी जबाबदारी स्वीकारणार नाही आणि जोपर्यंत निवडणूक होत नाही तोपर्यंत माझ्या जागी आम आदमी पक्षाचा कोणीतरी मुख्यमंत्री होईल. विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत पुढील नाव निश्चित होणार आहे. मनीष सिसोदिया हे देखील स्वतःची काळजी तेव्हाच घेतील जेव्हा दिल्लीची जनता प्रामाणिक आहे असे म्हणेल. आम्ही दोघे तुमच्यामध्ये येऊ. तुम्ही प्रामाणिक आहात, असे जनतेने सांगितले तर आम्ही या खुर्चीवर बसू. आज मी तुमच्यामध्ये आलो आहे, जर मी प्रामाणिक असेल तर मतदान करा, नाहीतर मत देऊ नका," असे आवाहन अरविंद केजरीवाल यांनी केले.

Web Title: 'Arvind Kejriwal wants to make his wife Chief Minister, BJP attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.