'आप' बनला राष्ट्रीय पक्ष; जाणून घ्या, राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कसा मिळतो आणि काय आहेत नियम?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 07:13 PM2022-12-08T19:13:39+5:302022-12-08T19:34:13+5:30
National Party AAP : आम आदमी पार्टी हा देशातील आठवा राष्ट्रीय पक्ष ठरला आहे. यापूर्वी देशात सात राष्ट्रीय पक्ष होते. त्यामध्ये काँग्रेस, भाजप, बसपा, सीपीआय, सीपीएम, एनसीपी आणि टीएमसीची नावे होती.
नवी दिल्ली : आम आदमी पार्टी (AAP) आज राष्ट्रीय पक्ष बनला (National Party) आहे. यासंदर्भात आम आदमी पार्टीचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी माहिती दिली आहे. गुजरातच्या जनतेने आम आदमी पार्टीला राष्ट्रीय पक्ष बनवले आहे, असे अरविंद केजरीवाल म्हणाले.
गुजरातमध्ये पार्टीला मिळालेल्या मतांच्या संख्येनुसार आम आदमी पार्टी आता राष्ट्रीय पक्ष बनला आहे. अवघ्या 10 वर्षात आम आदमी पार्टी देशातील काही राष्ट्रीय पक्षांमध्ये सामील झाला आहे. गुजरातमधील लोकांचे आभार व्यक्त करताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, "ज्यावेळी मी गुजरातमध्ये गेलो, तेव्हा मला खूप प्रेम मिळाले. मी तुम्हा सर्वांचा ऋणी राहीन. गुजरात हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. तो फोडण्यात आम्ही यशस्वी झालो. गुजरातमध्ये आम्हाला 13 टक्के मते मिळाली आहेत."
याचबरोबर, अरविंद केजरीवाल म्हणाले, "गुजरातच्या लाखो लोकांनी आम्हाला मतदान केले आहे. आम्ही संपूर्ण मोहीम सकारात्मक पद्धतीने चालवली. कोणाला शिवीगाळ केली नाही. फक्त कामाबद्दल बोललो. हेच आम्हाला इतर पक्षांपेक्षा वेगळे ठरवते. आजवर बाकीचे पक्ष धर्म आणि जातीचे राजकारण करत आले आहेत. पक्ष कामावर बोलण्याची ही पहिलीच वेळ आहे."
देशात किती राष्ट्रीय पक्ष आहेत?
आम आदमी पार्टी हा देशातील आठवा राष्ट्रीय पक्ष ठरला आहे. यापूर्वी देशात सात राष्ट्रीय पक्ष होते. त्यामध्ये काँग्रेस, भाजप, बसपा, सीपीआय, सीपीएम, एनसीपी आणि टीएमसीची नावे होती. देशात राष्ट्रीय पक्षांव्यतिरिक्त राज्यस्तरीय पक्ष आणि प्रादेशिक पातळीवरील पक्ष आहेत. प्रत्येकाचे प्रमाणही वेगळे असते.
राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कसा मिळतो?
कोणत्याही राजकीय पक्षाला राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी अनेक मानके पूर्ण करावी लागतात. मात्र, कोणत्याही पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळण्याचे दोन मार्ग आहेत. एक म्हणजे एखाद्या पक्षाचे लोकसभेत 4 सदस्य असतील आणि लोकसभा निवडणुकीत त्याला 6 टक्के मते मिळाली तर त्याला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळतो. दुसरीकडे, दुसरा मार्ग म्हणजे 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत 6 टक्क्यांहून अधिक मते मिळाली पाहिजेत .
आम आदमी पार्टीला कुठे आणि किती मते?
राष्ट्रीय पक्ष बनलेल्या आम आदमी पार्टीचे दिल्ली, पंजाब आणि दिल्ली एमसीडीमध्ये सरकार आहे. त्याचबरोबर. आम आदमी पार्टीचे गोव्यात सुद्धा दोन आमदार आहेत. गोवा विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने दोन जागा जिंकल्या आणि त्यांना 6.77 टक्के मते मिळाली. आता गुजरातमध्येही आम आदमी पार्टीला जवळपास 13 टक्के मते मिळाली आहेत. अशाप्रकारे, चार राज्यांमध्ये आम आदमी पार्टीचे 6 टक्क्यांहून अधिक मते झाली आहेत. त्यामुळे आम आदमी पार्टी 8 वा राष्ट्रीय पक्ष बनला आहे.