केजरीवाल यांच्या कार्यालयाने तीन वर्षात चहापानावर केला एक कोटींपेक्षा जास्त खर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2018 05:22 PM2018-04-13T17:22:54+5:302018-04-13T17:24:54+5:30
अरविंद केजरीवाल कार्यालयाने चहा-पानावर 1 कोटी 3 लाख 4 हजार 162 रूपये खर्च केला आहे.
नवी दिल्ली- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आता चहा-पानावर केलेल्या खर्चामुळे टीकाकारांच्या निशाण्यावर आले आहेत. सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल कार्यालयाने चहा-पानावर 1 कोटी 3 लाख 4 हजार 162 रूपये खर्च केला आहे. हल्द्वानीचे आरटीआय कार्यकर्ते हेमंत सिंह गोनिया यांनी फेब्रुवारी महिन्यात यासंदर्भात आरटीआयअंतर्गत माहिती मागविली होती. या आरटीआयअंतर्गत ही माहिती समोर आली आहे.
आरटीआयतून समोर आलेल्या माहितीनुसार आर्थिक वर्ष 2015-2016मध्ये चहा-पानावर कार्यालयाने 23.12 लाख रुपये खर्च केले. 2016-17मध्ये 46.54 लाख रूपये तर आर्थिक वर्ष 2017-18मध्ये चहा-पानावर 33.36 लाख रुपये खर्च करण्यात आला. 2016मधील 47.29 लाख रुपयातील 22 लाख 42 हजार 320 रुपयांचं बील सचिवालय कार्यालय आणि 24 लाख 86 हजार 921 रुपयाचं बील कॅम्प ऑफिसमध्ये आलं. दरम्यान, या प्रकरणावर मुख्यमंत्री कार्यालयातून काहीही प्रतिक्रिया आलेली नाही.
मुख्यमंत्री कार्यालयातील अशा प्रकारच्या खर्चावर लगाम लावणं गरजेचं आहे. ज्या लोकांना जेवळही मिळण मुश्किल आहे अशांवर हा पैसा खर्च करायला हवा. चांगल्या कामासाठी सरकार आपल्या खर्चात कपात करेल याचा विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया आरटीआय कार्यकर्ते गोनिया यांनी दिली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मुख्यकार्यालय भगवान दास रोडवरील दोन डुप्लेक्स फ्लॅटमध्ये स्थापित केलं. एका डुप्लेक्समध्ये अरविंद केजरीवाल स्वतः कुटुंबासह राहतात तर एका ड्युप्लेक्समध्ये कॅम्प ऑफिस तयार केलं आहे.
समोर आलेल्या खर्चाच्या आकडेवारीनुसार, 2015-26च्या काळात चहापानावर 23 लाख 12 हजार 430 रुपये खर्च झाले. यातील 5 लाख 59 हजार 280 रुपये कॅम्प ऑफिसमध्ये तर 17 लाख 53 हजार 150 रुपये सचिवालय ऑफिसमध्ये खर्च झाले. 2016-17मध्ये 46 लाख 54 हजार 833 रुपयामधील 15 लाख 91 हजार 631 रुपये सचिवालय ऑफिस आणि 30 लाख 63 हजार 202 रुपये कॅम्प ऑफिसमध्ये खर्च झाले. आर्थिक वर्ष 2017-18मध्ये दिल्ली सीएमच्या ऑफिसमधून चहापानावर खर्च केल्या गेलेल्या 33,36,899,रुपयांमधील 6,92,284 रुपये सचिवालय ऑफिसमध्ये तर 26,44,615 रुपये कॅम्प ऑफिसमध्ये खर्च झाले.
दरम्यान, याच प्रकारचं आरटीआय निवेदन उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांच्या ऑफिससंबंधीही टाकण्यात आलं आहे. दहा महिन्याच्या कार्यकाळात त्यांनी 68 लाख रुपये चहापानावर खर्च केल्याचं समोर आलं आहे.