केजरीवालांची हुकूमशहा वृत्ती पक्ष संपवेल- भूषण
By Admin | Published: March 27, 2015 02:02 PM2015-03-27T14:02:03+5:302015-03-27T14:40:41+5:30
अरविंद केजरीवाल हे हुकूमशहा असून त्यांची ही वृत्ती पक्षासाठी नुकसानदायक ठरेल असा आरोप प्रशांत भूषण यांनी केला आहे.
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २७ - अरविंद केजरीवाल हे हुकूमशहा असून त्यांची ही वृत्ती पक्षासाठी नुकसानदायक ठरेल असा आरोप प्रशांत भूषण यांनी केला आहे. पक्षात आपलाच अंतिम शब्द मानला जावा अशी त्यांची इच्छा असते, मात्र त्यांच्या या एकाधिकाराशाहीमुळे पक्ष संपेल असा इशारा भूषण यांनी दिला. दिल्लीतील पत्रकार परिषदेत प्रशांत भूषण व योगेंद्र यादव यांनी केजरीवाल व पक्षातील काही लोकांवर कडाडून हल्ला चढवला. आपण राष्ट्रीय कार्यकारिणीचा राजीनामा दिलेला नाही, मात्र तो देण्याची आमच्याकडे सतत मागणी करण्यात येत होती असेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
'आम आदमी पक्ष हा आंदोलनातून उदयाला आलेला पक्ष असून पक्षाचा संघर्ष स्वराज्यासाठी आहे. मात्र गेल्या महिन्याभरात पक्षात अनेक गोष्टी बिघडल्या असून आपचे रुपांतर देशातील इतर राजकीय पक्षांमध्ये होऊ नये एवढीच आमची इच्छा आहे', असे योगेंद्र यादव यांनी सांगितले. पक्षाने कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे. पक्षातील काही सदस्य मुद्दाम उलटसुलट माहिती पसरवून जनतेची दिशाभूल करत आहेत. पक्षाच्या वेबसाईटवरून संविधान काढण्यात आले. आणि आमच्यावरच संविधानाचे उल्लंघन केल्याचा आरोप लावण्यात आला. सध्या पक्षाच्या कृत्यांमुळे जनतेचा पक्षावरील विश्वास कमी होत असल्याचेही यादव यांनी सांगितले.
दिल्लीत प्रचंड बहुमताने सत्तेवर आलेल्या आम आदमी पक्षात नंतरच्या जेमतेम महिनाभरातच गृहयुद्धाचा भडका उडाला आहे. पक्षात सुरू असलेला कलह मिटण्याची चिन्हे दिसत नसून आजच्या पत्रकार परिषदेत यादव व भूषण यांनी केलेल्या आरोपांनंतर हा संघर्ष आणखी भडकण्याचीच शक्यता आहे.