भुकेसाठी 723 प्राण्यांची कत्तल होणार इतक्यात..., नामिबियातील प्राण्यांच्या रक्षणासाठी धावून आले अनंत अंबानी यांचे ‘वनतारा’
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2024 11:35 AM2024-09-06T11:35:10+5:302024-09-06T11:35:50+5:30
Anant Ambani: आफ्रिका खंडातील नामिबिया या देशात तीव्र दुष्काळ असून, त्यामुळे तेथील वन्यप्राण्यांना धोका निर्माण झाला आहे. तेथील ७२३ प्राण्यांची कत्तल करण्यात येणार असून त्यांना वाचविण्यासाठी प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांच्या वनतारा फाउंडेशनने पुढाकार घेण्याची तयारी दर्शविली आहे.
नवी दिल्ली - आफ्रिका खंडातील नामिबिया या देशात तीव्र दुष्काळ असून, त्यामुळे तेथील वन्यप्राण्यांना धोका निर्माण झाला आहे. तेथील ७२३ प्राण्यांची कत्तल करण्यात येणार असून त्यांना वाचविण्यासाठी प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांच्या वनतारा फाउंडेशनने पुढाकार घेण्याची तयारी दर्शविली आहे.
नामिबियामध्ये दुष्काळामुळे वन्यप्राणी सांभाळणे, त्यांचे रक्षण करणे हे अवघड काम बनले आहे. त्यामुळे भूक मिटवण्यासाठी तेथील सरकारने ७२३ प्राण्यांची कत्तल करावी लागणार आहे. त्यामध्ये ३० गेंडे, ६० म्हशी, आफ्रिकेत इंपाला नावाने ओळखली जाणारी ५० काळवीटे, १०० ब्लू वाईल्टबीस्ट, ३०० झेब्रा, ८३ हत्ती, १०० इलँड यांचाही समावेश आहे. सर्व आव्हानांवर मात करून प्रत्येक प्राण्याचे संरक्षण करणे हा वनतारा फाउंडेशनचा मुख्य हेतू आहे.
नेमके काय करतात?
संकटग्रस्त वन्यजीवांची काळजी व त्यांचे रक्षण करण्याचे महत्त्वाचे काम गुजरातमधील वनतारा फाउंडेशन ही संस्था करते.
गुजरातमधील जामनगर येथे ३५०० एकर क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या या प्रकल्पांत दोन हजार तज्ज्ञांची मदत घेतली जाते.
सुमारे दोन हजार प्रजातीच्या प्राण्यांचे संरक्षण व त्यांची काळजी घेण्यासाठी जामनगरमधील जागेत अतिशय आधुनिक सुविधा असलेले एक रुग्णालय व संशोधन केंद्र उभारण्यात आले आहे. याचा अनेक प्राण्यांना फायदा होत आहे.
काळजी घेण्यासाठी आम्ही कटिबद्ध
- वनतारा फाउंडेशनने म्हटले आहे की, प्राण्यांची कत्तल टाळण्यासाठी त्या प्राण्यांची त्यांच्या आयुष्यभर काळजी घेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
- संकटग्रस्त प्राण्यांची काळजी घेण्यासाठी नामिबिया सरकारबरोबर काम करण्याची वनतारा फाउंडेशनची इच्छा आहे. त्यामुळे आमच्या प्रस्तावाचा विचार करावा, असेही या फाउंडेशनने म्हटले आहे.