५ टक्के GSTचा परिणाम, अमूलचं दही, लस्सी, ताक सारं काही महागलं, आता असे असतील नवे दर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 01:49 PM2022-07-19T13:49:20+5:302022-07-19T13:49:52+5:30
Amul Products: जीएसटी परिषदेकडून पाकीटबंद खाद्य पदार्थांवर ५ टक्के जीएसटी लावण्यात आल्यानंतर आजपासून अमूलचं दही, लस्सी, ताक महागलं आहे. तसेच कंपनीने फ्लेवर्ड मिल्क बॉटलच्या दरामध्येही वाढ केली आहे. त्यामुळे आता लवकरच अमूलच्या दुधाच्या पिशवीचे दरही वाढण्याची शक्यता आहे.
मुंबई - जीएसटी परिषदेकडून पाकीटबंद खाद्य पदार्थांवर ५ टक्के जीएसटी लावण्यात आल्यानंतर आजपासून अमूलचं दही, लस्सी, ताक महागलं आहे. तसेच कंपनीने फ्लेवर्ड मिल्क बॉटलच्या दरामध्येही वाढ केली आहे. त्यामुळे आता लवकरच अमूलच्या दुधाच्या पिशवीचे दरही वाढण्याची शक्यता आहे.
१८ एप्रिलपासून या उत्पादनांवर जीएसटी लागू करण्यात आला होता. त्यानंतर आजपासून या पदार्थांच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी खिसा आणखी हलका होणार आहे.
अमूलने मुंबईमध्ये आपल्या २०० ग्रॅम दह्याच्या कपची किंमत आता २१ रुपये केली आहे. तर ४०० ग्रॅम दह्याचा कप आता ४२ रुपयांना मिळेल. पूर्वी या कपची किंमत ही ४० रुपये होती. पाऊचमध्ये मिळणारं ४०० ग्रॅम दहीसुद्धा आता पूर्वीच्या ३० रुपयांऐवजी ३२ रुपयांना मिळणार आहे. तर एक किलोच्या पॅकेटसाठी आता ६५ रुपयांऐवजी ६९ रुपये मोजावे लागणार आहेत.
मुंबईमध्ये ताकाच्या ५०० मिलीच्या पिशवीसाठी आता १५ रुपयांऐवजी १६ रुपये मोजावे लागतील. तर १७० मिली लस्सीही आता १ रुपयाने महागली आहे. मात्र २०० ग्रॅम लस्सी पूर्वीच्या किमतीमध्येच मिळेल. अमूलचे मॅनेजिंग डायरेक्टर आरएस सोढी यांनी सांगितले की, आम्ही छोट्या पाकिटावरील वाढलेल्या किमतीचा भार स्वत: उचलणार आहोत. मात्र काही उत्पादनांवर जीएसटी वाढल्यामुळे भाव वाढवावे लागत आहेत.
दरम्यान, जीएसटी वाढल्यानंतर भाववाढ करण्याचा निर्णय सर्वप्रथम अमूलने घेतला आहे. आता इतर कंपन्याही आपल्या उत्पादनांच्या दरात वाढ करतील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.