खासदार असताना लतादीदींनी एकदाही घेतले नाही वेतन, भत्ता; इतर सुविधांनाही दिला होता नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 10:38 AM2022-02-08T10:38:32+5:302022-02-08T10:39:09+5:30
लता मंगेशकर यांना १९९९ मध्ये राज्यसभेचे सदस्यत्व मिळाले हाेते. त्या २००५ पर्यंत खासदार हाेत्या. संसदेच्या माहिती व तंत्रज्ञान विषयाच्या स्थायी समितीच्या त्या सदस्य हाेत्या.
नवी दिल्ली : स्वरसम्राज्ञी स्व. लता मंगेशकर या महान गायिका हाेत्या. तसेच त्या मनानेही तेवढ्याच माेठ्या हाेत्या. त्या कायम स्वाभिमानाने जगल्या. लता मंगेशकर या राज्यसभा सदस्य हाेत्या. सदस्यत्वाच्या सहा वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी एकदाही वेतन घेतले नाही. एवढेच नव्हे, तर त्यांनी खासदार म्हणून मिळणाऱ्या सुविधांचा एकदाही वापर केला नाही.
लता मंगेशकर यांना १९९९ मध्ये राज्यसभेचे सदस्यत्व मिळाले हाेते. त्या २००५ पर्यंत खासदार हाेत्या. संसदेच्या माहिती व तंत्रज्ञान विषयाच्या स्थायी समितीच्या त्या सदस्य हाेत्या. याशिवाय त्या माहिती व प्रसारण खात्याच्या सल्लागार समितीच्याही सदस्य होत्या. याकाळात त्यांनी एकदाही वेतन आणि काेणताही भत्ता किंवा सुविधा घेतली नाही. त्यांना खासदार म्हणून वेतनाचा धनादेश देण्यात येत हाेता. मात्र, त्यांनी ताे प्रत्येक वेळी परत केला. दिल्लीत खासदारांना मिळणारे निवासस्थानही त्यांनी घेतले नाही. मुळात त्या राज्यसभा सदस्यत्वासाठी अनुत्सुक हाेत्या.
सन्मानार्थ टपाल तिकीट
भारतरत्न स्वरसम्राज्ञी स्व. लता मंगेशकर यांच्या सन्मानार्थ केंद्र सरकार लवकरच टपाल तिकीट जारी करणार आहे. केंद्रीय रेल्वे, माहिती व तंत्रज्ञान खात्याचे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एका कार्यक्रमामध्ये ही माहिती दिली.