यंदाच्या सणासुदीत मिळणार तब्बल १२.५ लाख नोकऱ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2024 01:54 PM2024-08-10T13:54:46+5:302024-08-10T13:55:01+5:30
यातील १० लाख नोकऱ्या हंगामी स्वरूपाच्या, तर २.५ लाख नोकऱ्या कंत्राटी स्वरूपातील असतील, असेही मानले जात आहे.
नवी दिल्ली : नागपंचमीसोबत सणासुदीच्या हंगामास सुरुवात होत असून, यंदा या हंगामात १२.५ लाख नवे रोजगार निर्माण होतील, असा अंदाज आहे. यातील १० लाख नोकऱ्या हंगामी स्वरूपाच्या, तर २.५ लाख नोकऱ्या कंत्राटी स्वरूपातील असतील, असेही मानले जात आहे.
‘टीमलीज सर्व्हिसेस’ने जारी केलेल्या अहवालात ही माहिती दिली आहे. अहवालात म्हटले आहे की, सणासुदीच्या हंगामात यंदा ई-कॉमर्स उद्योगाच्या विक्रीत ३५ टक्के वाढ होईल. माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्र हळूहळू मंदीतून बाहेर येत आहे. सर्व तंत्रज्ञानविषयक रोजगारांत ७० टक्के मागणी सॉफ्टवेअर क्षेत्रात आहे.
‘टीमलीज’चे वरिष्ठ उपाध्यक्ष बालासुब्रमण्यम ए. यांनी सांगितले की, यंदाच्या रोजगार निर्मितीतून २०२५ पर्यंत ५ हजार अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे भारताचे लक्ष्य गाठण्यास मोठी मदत मिळेल.