रेल्वेत तब्बल 3 लाख जागांचे रिक्त ‘डबे’; १८,४६३ शिकाऊ प्रशिक्षणार्थींची नियुक्ती, एकही कायम नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2023 06:41 AM2023-01-03T06:41:10+5:302023-01-03T06:42:18+5:30
Indian Railway : रेल्वे विभागाच्या मते रिक्त पदांची संख्या ३.११ लाख आहे.तंत्रज्ञान वेगाने विकसित होत आहे.
- हरीश गुप्ता
नवी दिल्ली : रिक्त पदे भरण्यासाठी कठोर परिश्रम घेत असल्याचा दावा रेल्वे मंत्रालय करीत असले तरी १ डिसेंबर २०२२ च्या आकडेवारीनुसार रेल्वेत तीन लाखांहून अधिक रिक्त पदे असल्याचे स्पष्ट झाले आहे. सुरक्षा आणि वाहतूक विभागांसह रेल्वेच्या विविध विभागात राजपत्रित आणि अराजपत्रित श्रेणींमध्ये रिक्त पदांचा समावेश आहे. रेल्वे विभागाच्या मते रिक्त पदांची संख्या ३.११ लाख आहे.तंत्रज्ञान वेगाने विकसित होत आहे.
कर्मचारी कपातीची मानसिकता
कर्मचाऱ्यांना बदललेल्या वातावरणात प्रशिक्षित करणे आणि स्वत:ला पुन्हा दिशा देण्याची गरज असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा आकार कमी करण्यासाठी ते उत्सुक आहेत.
भरतीसाठी निश्चित कालमर्यादाही नाही
ही रिक्त पदे कधी भरता येतील याबाबत रेल्वेने कोणतीही कालमर्यादा निश्चित केली नाही. विशेष म्हणजे, रेल्वेने गेल्या पाच वर्षांत १८,४६३ शिकाऊ प्रशिक्षणार्थींची नियुक्ती केली. मात्र, या कालावधीत यापैकी एकाही शिकाऊ उमेदवाराला कायम करण्यात आलेले नाही.
रेल्वे अप्रेंटिसशिप कार्यक्रम पुन्हा सुरु करण्याचा विचार आहे का, असे विचारले असता मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, असा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही.
तीन सदस्यीय टास्क फोर्स
नोकरशाहीमध्ये पंतप्रधानांच्या ‘कर्मयोगी’ संकल्पनेची अंमलबजावणी करण्यासाठी पंतप्रधानांनी इन्फोसिसचे माजी सीईओ एस. डी. शिबू लाल यांच्या नेतृत्वाखाली तीन सदस्यीय टास्क फोर्सची स्थापना केली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वेतील तीन लाखांसह केंद्र सरकारमध्ये १० लाखांहून अधिक पदे रिक्त आहेत. तेही भरून काढण्याची सरकारला घाई नाही हेच यावरून दिसते.
एकूण रिक्त पदे
विभाग पदसंख्या
अकाऊंट १२४५५
प्रशासन ४२२७
सिव्हिल ८७६५४
इलेक्ट्रिकल ३८०९६
मेकॅनिकल ६४३४६
मेडिकल ५१९३
पर्सोनेल ३९४४
सिक्युरिटी ९०६८
सिग्नल, टेलिकम्युनिकेशन १४८१५
स्टोअर ८८८१
ट्रॅफिक ट्रान्स्पोर्टेशन ६२२६४
अन्य ५७८
एकूण ३११५२१