धक्कादायक! डॉक्टरांनी ऑपरेशन करून मद्यपीच्या पोटातून काढले तब्बल 63 चमचे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2022 02:01 PM2022-09-29T14:01:55+5:302022-09-29T14:05:41+5:30
मुजफ्फरनगर जिल्ह्यातील एका मद्यपींच्या पोटातून तब्बल 63 चमचे काढण्यात आले.
मुजफ्फरनगर : आजच्या धावपळीच्या जगात अनेकांना त्यांच्या खाण्याच्या सवयींमध्ये बदल करावा लागतो. अनेक वेळा जेवणामुळे होणाऱ्या छोट्या समस्यांमुळे लोकांना उतरत्या वयात मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते. जेवणाची ठरावीक वेळ नसल्यामुळे अनेक आजार उद्भवतात. मात्र एका मद्यपीने चक्क चमचांचा आहार घेतल्याचे समोर आले आहे. हा प्रकार ऐकून सर्वांनाच धक्का बसत आहे. लक्षणीय बाब म्हणजे डॉक्टरांनी त्या व्यक्तीच्या पोटातून तब्बल 63 स्टीलचे चमचे काढले आहेत.
दरम्यान, ही घटना उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर जिल्ह्यातील आहे, जिथे मसूरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील बोपडा गावात राहणाऱ्या विजयसोबत हा विचित्र प्रकार पाहायला मिळाला. विजयला मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचे व्यसन होते, त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी त्याला शामली येथील व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केले. सुमारे महिनाभर विजय व्यसनमुक्ती केंद्रात थांबला होता. येथेच त्यांची तब्येत अचानक बिघडली, त्यानंतर त्याला मुजफ्फरनगरच्या भोपा रोडवरील इवान मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
पोटातून काढले 63 चमचे
अचानक पोटात तीव्र वेदना होत असल्याची तक्रार विजयने डॉक्टरांकडे केली. विजयची प्रकृती चिंताजनक असल्याचे पाहून डॉक्टरांनी पोटाचे ऑपरेशन केले, ज्यामध्ये विजयच्या पोटातून तब्बल 63 स्टीलचे चमचे बाहेर आले. पोटातून इतके चमचे बाहेर पडल्यानंतर डॉक्टर आणि कुटुंबीय देखील हैराण झाले आहेत. इतके चमचे पोटात कसे गेले याचा शोध डॉक्टरांना अद्याप लागलेला नाही. तर विजयला व्यसनमुक्ती केंद्रातच चमचे खाऊ घातले असावेत, असे कुटुंबीयांचे मत आहे. मात्र याबाबत रुग्ण विजयने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. विजयच्या पोटातून चक्क चमचे बाहेर आल्यामुळे त्याचे कुटुंबीय व्यसनमुक्ती केंद्रावर आरोप करत आहेत.