बिष्णोई टोळीत तब्बल ७०० गुंड, दाऊद टोळीची जागा घेण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 07:09 AM2024-10-16T07:09:29+5:302024-10-16T07:12:06+5:30

अंडरवर्ल्डवर हुकूमत गाजवण्याच्या हालचाली संपूर्ण बॉलिवूडला दहशतीखाली ठेवणाऱ्या दाऊद टोळीची जागा घेण्याचा प्रयत्न

As many as 700 gangsters in Bishnoi gang, attempt to replace Dawood gang | बिष्णोई टोळीत तब्बल ७०० गुंड, दाऊद टोळीची जागा घेण्याचा प्रयत्न

बिष्णोई टोळीत तब्बल ७०० गुंड, दाऊद टोळीची जागा घेण्याचा प्रयत्न

नवी दिल्ली : अजित पवार गटाचे नेते व माजी आमदार बाबा सिद्दीकी यांची हत्या बलकरण बरार उर्फ लॉरेन्स बिष्णोई याच्या टोळीने केली, असे पोलिस तपासात आढळून आले आहे. काळवीट हत्या प्रकरणातील आरोपी सलमान खान याचा बदला घेण्यासाठी प्रयत्न करणारी बिष्णोई टोळी आता संपूर्ण बॉलिवूडलाच आपल्या दहशतीखाली ठेवण्याच्या प्रयत्नांत आहे. दाऊद इब्राहिमच्या टोळीची जागा घेऊ पाहणाऱ्या बिष्णोई टोळीत सुमारे ७०० गुंडांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.

१९९८ साली काळवीट हत्या प्रकरण घडले त्यावेळी लॉरेन्स बिष्णोई व त्याचे साथीदार कोणालाही माहीत नव्हते. त्यानंतर २६ वर्षांनी बिष्णोईच्या टोळीने देशभर हातपाय पसरायला सुरुवात केली. सलमान खानचे मित्र व माजी आमदार बाबा सिद्दीकी यांची हत्या करून त्या टोळीने आपले इरादे स्पष्ट केले. जो सलमान खान व दाऊद गँगला मदत करेल त्याचा बंदोबस्त करण्याची धमकी बिष्णोई टोळीने फेसबुकवरील एका पोस्टमध्ये दिली.

तुरुंगात असूनही लॉरेन्स बिष्णोई इतरांच्या हत्येचे कट आखतो व त्याप्रमाणे त्याचे साथीदार कारवाया करतात, असा आरोप आहे. २०२२ साली पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याची, तर सुखदेवसिंग गोगामेडी याची २०२३ मध्ये बिष्णोई टोळीने हत्या केली. गायक ए. पी. धिल्लन, गिप्पी ग्रेवाल यासारख्या नामवंतांच्या घराबाहेर या टोळीच्या गुंडांनी गोळीबार केला होता. (वृत्तसंस्था)

सलमान खानशी जुने वैर
पोलिसांनी सांगितले की, अभिनेता सलमान खान व बिष्णोई गँगमध्ये वैर असल्याची गोष्ट २०१८ साली प्रथम उघडकीस आली. बिष्णोई याने जोधपूर न्यायालयात तसे सांगितले होते. आम्ही सलमान खानची हत्या करणार आहोत. तसे पाऊल उचलले की सर्वांना ते कळेलच. मात्र मी आतापर्यंत त्या दिशेने काहीही पावले उचलली नाहीत. तरीही काही गुन्ह्यांत मला विनाकारण गोवण्यात आले आहे, असे लॉरेन्स बिष्णोईने म्हटले होते. यंदा एप्रिल महिन्यात सलमान खान याच्या वांद्रे येथील निवासस्थानाबाहेर दोन जणांनी गोळीबार केला होता.

‘लॉरेन्सने स्वत: एकही हत्या केली नाही’
लॉरेन्स बिष्णोईने आतापर्यंत स्वत: एकाही व्यक्तीची हत्या केलेली नाही. तरीही तो गुजरात तुरुंगात आपल्या टोळीची सूत्रे हलवत असल्याचे सांगण्यात येते. त्याच्या टोळीत शार्पशूटरसह ७०० गुंड आहेत. अनेक युवक बिष्णोई टोळीमध्ये शार्पशूटरचे काम करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: As many as 700 gangsters in Bishnoi gang, attempt to replace Dawood gang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.