एक, दोन नाही तब्बल सात वेळा समन्स! हेमंत सोरेन ईडीसमोर झाले नाही हजर, प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2023 01:52 PM2023-12-30T13:52:50+5:302023-12-30T13:53:27+5:30
Jharkhand CM Hemant Soren News: केंद्रीय एजन्सीचा वापर करून सरकारची प्रतिमा मलिन करण्याचे प्रयत्न केले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Jharkhand CM Hemant Soren News: एकीकडे दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना ईडीने नोटीस बजावत चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले. मात्र, अरविंद केजरीवाल विपश्यना शिबिरासाठी गेले. ईडीने दोन वेळा समन्स बजावले होते. तर, दुसरीकडे एका प्रकरणात ईडीने सहावेळा समन्स बजावूनही झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन ईडीसमोर हजर झाले नसल्याचे सांगितले जात आहे. ईडीने सातव्यांदा समन्स बजावत चौकशीसाठी हजर होण्याचे निर्देश दिले आहेत.
अंमलबजावणी संचालनालयाने जमीन घोटाळ्याप्रकरणी हेमंत सोरेन यांना पीएमएलए अंतर्गत सातवे समन्स जारी केले आहे. या प्रकरणी हेमंते सोरेन यांनी आपले म्हणणे मांडावे, असे ईडीने म्हटले आहे. कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी ईडीने सोरेन यांना नव्याने समन्स बजावले होते. परंतु हेमंत सोरेन चौकशासाठी उपस्थित राहिले नसल्याची माहिती देण्यात आली आहे.
एक, दोन नाही तब्बल सात वेळा ईडीचे समन्स
ईडीने हेमंत सोरेन यांना यापूर्वी सहा वेळा समन्स बजावले. मात्र, हेमंत सोरेन एकदाही हजर झाले नाहीत. या प्रकरणी ईडीने आयएएस अधिकारी छवी रंजन यांच्यासह १४ जणांना अटक केली आहे. ईडीने समन्स जारी केल्यानंतर सोरेन म्हणाले की, केंद्रीय एजन्सीचा वापर करून आपल्या सरकारची प्रतिमा डागाळण्याचे प्रयत्न केले जात आहेत, असा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, झारखंडमधील भूमाफियांनी बेकायदेशीरपणे मालकीमध्ये बदल करून जमिनी हडप केल्याचा आरोप आहे. ईडी या प्रकरणाचा तपास करत आहे. या प्रकरणी आतापर्यंत १४ जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये आयएएस अधिकारी छवी रंजन यांचा समावेश आहे.