शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2024 13:40 IST2024-09-23T13:36:13+5:302024-09-23T13:40:00+5:30
Atishi Took Charge As Delhi CM: आतिशी यांनी आज दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला. आतिशी यांनी पदभार स्वीकारताना मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात एक वेगळंच चित्र दिसलं. आतिशी यांनी अरविंद केजरीवाल यांची खुर्ची तशीच रिक्त ठेवत त्या शेजारच्या खुर्चीवर बसून आपल्या कामकाजास सुरुवात केली.

शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’
अरविंद केजरीवाल यांनी दिलेल्या मुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर आम आदमी पक्षाच्या महिला नेत्या आतिशी मार्लेना यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. दरम्यान, आतिशी यांनी आज दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला. आतिशी यांनी पदभार स्वीकारताना मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात एक वेगळंच चित्र दिसलं. आतिशी यांनी अरविंद केजरीवाल यांची खुर्ची तशीच रिक्त ठेवत त्या शेजारच्या खुर्चीवर बसून आपल्या कामकाजास सुरुवात केली.
मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आतिशी म्हणाल्या की, मी मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसले तरी आमचे सर्वोच्च नेते हे अरविंद केजरीवाल हेच असतील, हे आम्ही निश्चित केले आहे. ज्या प्रकारे भरताने सिंहासनावर श्रीरामांच्या पादुका ठेवून राज्य सांभाळले होते. त्याप्रमाणेच मी मुख्यमंत्रिपदाची खुर्ची सांभाळेन, असे त्यांनी सांगितले. यावेळी आतिशी यांच्या शेजारची मुख्य खुर्ची रिकामी होती. ही खुर्ची केजरीवाल यांच्या पुनरागमपर्यंत याच खोलीत राहील. तसेच या खुर्चीला अरविंद केजरीवाल यांच्या पुनरागमनाची प्रतीक्षा असेल, असेही आतिशी यांनी सांगितले.
आतिशी पुढे म्हणाल्या की, आज माझ्या मनामध्ये भरताची व्यथा आहे. भाजपाने अरविंद केजरीवाल यांच्यावर चिखलफेक करण्यामध्ये कुठलीही कमतरता ठेवलेली नाही. जोपर्यंत दिल्लीमधील जनता त्यांचा प्रामाणिकपणा सिद्ध करत नाहीत, तोपर्यंत खुर्चीवर बसणार नाही, असे अरविंद केजरीवाल यांनी स्पष्टपणे सांगत राजीनामा दिला आहे. मात्र दिल्लीतील जनता अरविंद केजरीवाल यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदावर बसवतील, असा विश्वासही आतिशी यांनी व्यक्त केला.
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी १७ सप्टेंबर रोजी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आम आदमी पक्षाने त्यांच्या जागी आतिशी यांची दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी निवड केली होती.