RSS च्या शाखेत बॉल जाताच वाद पेटला, लाठ्या-काठ्यांनी हाणामारी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2022 05:24 PM2022-05-08T17:24:53+5:302022-05-08T23:16:53+5:30
जुही बारादेवी निवासी अनुराग पाल हे इंटरमिडीएटचे विद्यार्थी आहेत.
कानपूर - कानपूरच्या नौबस्ता येथील बालाजी पार्कमध्ये शनिवारी क्रिकेट खेळत असलेल्या विद्यार्थ्यांचा बॉल आर.आर.एसच्या ग्रुपमध्ये गेला. त्यामुळे, नाराज झालेल्या आर.एस.एसच्या स्वयंसेवकांनी या विद्यार्थ्यांना पळून-पळून लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली. त्यानंतर, काही वेळातच विद्यार्थ्यांच्या बाजुनेही मारहाण करण्यासाठी काही लोकं आली. त्यामुळे, दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी झाली. या मारहाणीच्या गोंधळात तीनजण गंभीर जखमी झाले असून पोलिसांनी दोन्ही गटांतील लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
जुही बारादेवी निवासी अनुराग पाल हे इंटरमिडीएटचे विद्यार्थी आहेत. अनुरागने मीडियाशी बोलताना सांगितले की, ते किदवई नगर ब्लॉकमध्ये कोचिंग शिकण्यासाठी जात होते. एक क्लास झाल्यानंतर दुसऱ्या क्लासच्या सुरु होण्यापूर्वी अर्ध्या तासाचा अवधी मिळतो. या अर्ध्या तासाच्या वेळेत आपल्या मित्रांसमवेत ते जवळच असलेल्या बालाजी पार्कमध्ये आपल्या मित्रांसमवेत क्रिकेट खेळायला गेले होते. याचवेळी, पार्कमध्ये आरएसएसची शाखाही सुरू होती. दरम्यान, मॅच खेळणाऱ्या विद्यार्थ्यांचा चेंडू आरएसएसच्या शाखेत गेला. त्यामुळे, नाराज झालेल्यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यातूनच, तेथील 20 ते 25 जणांनी लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली. त्यामध्ये, अनुराग पाल, आर्यन राजावत, आर्यन गुप्ता यांच्या डोक्याला जबर मार लागला.
याप्रकरणी, विद्यार्थ्यांनी 112 ला फोन करुन घडलेल्या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देण्यापूर्वीत मारहाण करणारे पळून गेले होते. त्यामुळे, विद्यार्थ्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दिली. त्यानंतर, काही वेळातच आरएसएसचेही स्वयंसेवक तेथे आले, त्यांनीही विद्यार्थ्यांविरुद्ध पोलीस तक्रार दाखल केली. पोलीस निरीक्षक रत्नेश सिंह यांनी यासंदर्भात माहिती देताना गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू असल्याचे सांगितले.