पुन्हा भाजप सरकार येताच ‘मोदी की गॅरंटी’तील आश्वासनांची पूर्ती  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 05:36 AM2024-04-15T05:36:16+5:302024-04-15T05:37:01+5:30

प्रत्येक आश्वासन पूर्ण करण्यासाठी कालमर्यादा; पहिल्या १०० दिवसांचा रोडमॅप तयार : मोदी

As soon as the BJP government comes again, the promises in Modi Ki Guarantee will be fulfilled | पुन्हा भाजप सरकार येताच ‘मोदी की गॅरंटी’तील आश्वासनांची पूर्ती  

पुन्हा भाजप सरकार येताच ‘मोदी की गॅरंटी’तील आश्वासनांची पूर्ती  

संजय शर्मा / सुनील चावके, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली :  नवे सरकार सत्तेत येताच ‘मोदी की गॅरंटी’ या संकल्पपत्रात दिलेल्या आश्वासनांवर काम सुरू होईल. तसेच, प्रत्येक आश्वासन पूर्ण करण्यासाठी कालमर्यादा निश्चित करण्यात येईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. त्याशिवाय सरकारच्या पहिल्या १०० दिवसांचा रोडमॅपही निश्चित केला आहे. सरकार स्थापन झाल्यावर त्यावरही काम सुरू केले जाईल, असेही मोदी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळ बैठकीत सर्व मंत्र्यांकडून भविष्यातील त्यांच्या योजनांचा रोडमॅप घेतला होता. जेणेकरून नवे सरकार आल्यावर त्यावर वेळ खर्च करण्याऐवजी त्याच्या अंमलबजावणीवर भर दिला जाईल, असे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले. 

गरीब कुटुंबांसाठी...
- प्रत्येक घरात नळाद्वारे स्वच्छ जल पुरवठा सुनिश्चित करणार
- पीएम उज्ज्वला योजना कायम ठेवत पाइपद्वारे गॅस पुरवठा करणार 

मध्यमवर्गीयांसाठी...
- रोजगार निर्मितीसाठी स्टार्टअप योजनेचा विस्तार करणार. एम्स आणि आयुष्मान आरोग्य मंदिरांचा विस्तार, जनऔषधी केंद्रांवर स्वस्त औषधे उपलब्ध करणार 
- नवे आयआयटी, आयआयएम आणि एम्सच्या स्थापनेसह शैक्षणिक गुणवत्तेला प्रोत्साहन देणार. 

‘मोदी की गॅरंटी’मध्ये आणखी काय? 
तरुणांना संधी
- सरकारी नोकरभरतीत होणाऱ्या गैरप्रकारांना रोखण्यासाठी कठोर कायद्याची अंमलबजावणी करणार
- तरुणांना समान संधी, नेतृत्व कौशल्य आणि स्वयंसेवेसाठी ‘मेरा युवा भारत’ कार्यक्रमाचा विस्तार करणार

कामगारांचा सन्मान
- असंघटित कामगारांसाठी पीएम जीवनज्योती विमाआणि पीएम सुरक्षा विम्यासारख्या सामाजिक सुरक्षा योजना विस्तारणार. 
- पीएम स्वनिधी योजनेचा विस्तार करुन गाव आणि तालुक्यांमध्ये फेरीवाले आणि टपरीवाल्यांचा समावेश करणार
- ट्रकचालकांसाठी राष्ट्रीय महामार्गांवर आधुनिक सुविधा विकसित करणार
- ऑटो, टॅक्सी, ट्रक आणि अन्य चालकांची ई-श्रम प्लॅटफॉर्मवर नोंदणी करणार

सबका साथ, सबका विकास
- आदिवासी मुलांमधील कुपोषण, सिकलसेल निर्मूलनावर भर, पीएम सूरजच्या माध्यमातून सहज कर्ज 
- बिरसा मुंडा यांची १५० जयंती २०२५ मध्ये अनुसूचित जमाती गौरववर्ष म्हणून साजरे करणार 
- ओबीसी, एससी, एसटी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजनेचा विस्तार करणार 

शेतकऱ्यांसाठी 
- पीक नुकसानीचे तातडीने पंचनामे, कालबद्ध भरपाई देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार 
- तूर, उडीद, मसूर, मूग व चना डाळी तसेच सरसो, सोयाबीन, तीळ आणि शेंगदाणा तेल उत्पादनासाठी प्रोत्साहन देणार
- पौष्टिक भाज्यांच्या उत्पादनाला प्रोत्साहन तसेच भाजीपाला उत्पादन, साठवणूक आणि वितरणासाठी क्लस्टरची स्थापना करणार.
- कृषीविषयक घडामोडींसाठी स्वदेशी भारत कृषी उपग्रहाचे प्रक्षेपण करणार  
- कृषी यंत्र आणि उपकरणासाठी कस्टम हायरिंग केंद्रांची संख्या दुप्पट 

विश्वबंधू भारत
- संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत कायम सदस्यत्व मिळविण्यासाठी प्रतिबद्ध 
- योग आणि आयुर्वेदाचा जगभर प्रसार करणार
- भारतातून नेलेल्या विविध मूर्ती परत आणणार
- श्रीरामाच्या वारशाचे रक्षण आणि रामायण उत्सवाद्वारे जगभर प्रचार

सुरक्षित भारत
- दहशतवादाविरुद्ध झीरो टॉलरन्स धोरण
- अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी प्रयत्न
- केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांची क्षमता वाढविणार
- मजबूत सायबर सुरक्षा धोरण लागू करणार

नारी शक्तीचे सक्षमीकरण
- महिला बचत गटांना आयटी, आरोग्य, शिक्षण, रिटेल आणि पर्यटन क्षेत्रांशी जोडणार 
- नोकरदार महिलांसाठी शहरात वसतिगृहाची निर्मिती
- गर्भाशयाच्या कर्करोगाचे उच्चाटन करण्यासाठी विशेष मोहीम राबविणार

समृद्ध भारत
- भारताला जगातील तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनविणार
- वित्तीय स्थैर्य कायम राखणार, रोजगाराच्या संधी वाढविणार
- निर्यातीला प्रोत्साहन, आर्थिक कायद्यांमध्ये सुधारणा

विश्वस्तरीय पायाभूत सुविधा
- दरवर्षी ५ हजार किमी रेल्वेमार्गाची निर्मिती
- प्रवासी रेल्वे तिकिटांची प्रतीक्षा संपविणार
- वंदे भारत, अमृत भारत गाड्यांच्या विस्तार करणार
- लांब पल्ल्याच्या वंदे स्लीपर गाड्या सुरू करणार

Web Title: As soon as the BJP government comes again, the promises in Modi Ki Guarantee will be fulfilled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.