"दार उघडताच..."; TTD अध्यक्ष बीआर नायडू यांनी सांगितलं तिरुपतीत चेंगराचेंगरीदरम्यान नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 10:47 IST2025-01-09T10:46:38+5:302025-01-09T10:47:14+5:30
तिरुपती मंदिर परिसरातील चेंगराचेंगरीत मृत्यू पावलेल्या भाविकांप्रति पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे...

"दार उघडताच..."; TTD अध्यक्ष बीआर नायडू यांनी सांगितलं तिरुपतीत चेंगराचेंगरीदरम्यान नेमकं काय घडलं?
आंध्रप्रदेशातील 'तिरुपती विष्णू निवासम' या निवासी परिसरात बुधवारी (९ जानेवारी) रात्रीच्या सुमारास चेंगराचेंगरी झाली. या दुर्गटनेत ६ भाविकांचा मृत्यू झाला तर ४० जण जखमी झाले आहेत. वैकुंठ द्वार येथील दर्शनाचे टोकन मिळविण्यासाठी येथे भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी हा प्रकार घडला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, टीटीडीचे अध्यक्ष बीआर नायडू यांनी संबंधित घटनेसंदर्भात माध्यमांना माहिती दिली आहे.
काय म्हणाले टीटीडीचे अध्यक्ष बीआर नायडू?
चेंगराचेंगरीच्या घटनेसंदर्भात माध्यमांसोबत बोलताना टीटीडीचे अध्यक्ष बीआर नायडू म्हणाले, "ही एक दु:खद घटना आहे. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी अधिकाऱ्यांच्या कामावर नाराजी व्यक्त केली आहे. काही अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडली. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू तिरुपतीला भेट देणार आहेत. भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये, यादृष्टीने उपाययोजना करण्यात येतील. उत्सवादरम्यान अशी घटना घडणे दुर्दैवी आहे. वैकुंठ एकादशी दर्शनाच्या व्यवस्थेबाबत मुख्यमंत्री गंभीर आहेत आणि त्यांनी अधिकाऱ्यांशीही चर्चा केली आहे."
चेंगराचेंगरीच्या कारणासंदर्भात बोलताना नायडू म्हणाले, "रांगेत उभ्या असलेल्या एका महिलेची प्रकृती अचानक बिघडली. यानंतर, संबंधित महिलेला रुग्णालयात नेण्यासाठी दारवाजा उघडण्यात आला. दरवाजा उघडताच चेंगराचेंगरी झाली."
PM मोदींनी व्यक्त केलं दु:ख -
तिरुपती मंदिर परिसरातील चेंगराचेंगरीत मृत्यू पावलेल्या भाविकांप्रति पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर त्यांनी म्हटले आहे, "आंध्र प्रदेशातील तिरुपतिमध्ये घडलेल्या चेंगराचेंगरीमुळे दुःखी आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले, माझ्या सहवेदना त्यांच्यासोबत आहेत. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी मी प्रार्थना करतो"
Pained by the stampede in Tirupati, Andhra Pradesh. My thoughts are with those who have lost their near and dear ones. I pray that the injured recover soon. The AP Government is providing all possible assistance to those affected: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) January 8, 2025
जखमी रुग्णालयात दाखल -
या दुर्घटनेनंतर, ४० जखमींपैकी २८ जणांना रुईया रुग्णालयात, तर १२ जणांना सीआयएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुर्दैवाने ४ भाविकांचा रुईयामध्ये आणि २ भाविकांचा सिम्समध्ये मृत्यू झाला. मृतांमध्ये ५ महिला आणि १ पुरूषाचा समावेश आहे.
वैकुंठ एकादशीचा कार्यक्रम -
मिळालेल्या माहितीनुसार, १०-१९ जानेवारीदरम्यान वैकुंठ दर्शन सुरू होणार आहे. या कालावधीत लाखो भाविक दर्शनासाठी तिरुपती मंदिरात येतील. यासाठी तिरुपती मंदिर ट्रस्टने संपूर्ण तयारीही केली आहे. टीटीडीने गुरुवारपासून तिरुपतीमधील ९ केंद्रांमध्ये ९४ काउंटर्सवर वैकुंठ द्वार येथील दर्शनाचे टोकन देण्याची व्यवस्था केली आहे.