‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 03:38 PM2024-05-17T15:38:30+5:302024-05-17T16:19:03+5:30

Swati Maliwal News: आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालिवाल यांना मुख्यमंत्र्यांच्या  निवासस्थानी झालेल्या मारहाणीच्या प्रकरणात ठराविक वेळाने नवनवी वळणं येत आहेत. त्याचदरम्यान १३ मे रोजी घडलेल्या त्या मारहाणीवेळचा स्वाती मालिवाल यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. तसेच या व्हिडीओबाबत स्वाती मालिवाल यांची प्रतिक्रियाही समोर आली आहे.

'As usual the political hitman tried to save himself', Swati Maliwal's reply from that video | ‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर

‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर

आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालिवाल यांना मुख्यमंत्र्यांच्या  निवासस्थानी झालेल्या मारहाणीच्या प्रकरणात ठराविक वेळाने नवनवी वळणं येत आहेत. या प्रकरणी स्वाती मालिवाल यांनी दंडाधिकाऱ्यांसमोर आपला जबाब नोंदवला आहेत. त्याचदरम्यान १३ मे रोजी घडलेल्या त्या मारहाणीवेळचा स्वाती मालिवाल यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. तसेच या व्हिडीओबाबत स्वाती मालिवाल यांची प्रतिक्रियाही समोर आली आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी स्वाती मालिवाल यांना मारहाण झाली होती. केजरीवाल यांचे सचिव विभव कुमार यांनी मारहाण केल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, त्या मारहाणीवेळचा एक छोटा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देताना स्वाती मालिवाल म्हणाल्या की, नेहमीप्रमाणे यावेळीही राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. आपल्या लोकांकडून ट्विट करवून घेत, कुठलाही संदर्भ नसलेला अर्धा व्हिडीओ शेअर करून या गुन्हापासून स्वत:ला वाचवता येईल, असे त्यांना वाटत आहे. मात्र कुणी मारहाण होत असताना व्हिडीओ तयार करू शकतं का? त्या घराच्या आतील आणि खोलीमधील सीसीटीव्हीची तपासणी होईल, तेव्हा सत्य सर्वांच्या समोर येईल. ज्या पातळीपर्यंत घसरायचं तेवढं घसरा, देव सगळं काही बघतोय. एक ना एक दिवस सत्य जगासमोर येईल, असा दावाही स्वाती मालिवाल यांनी केला.  

दरम्यान, आज व्हायरल झालेल्या या व्हीडिओमध्ये आपच्या खासदार स्वाती मालिवाल या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बसल्या असून, तिथले सुरक्षा कर्मचारी त्यांना बाहेर जाण्यास सांगत आहेत. याच दरम्यान त्या विभव कुमार यांच्यावर रागावताना दिसत आहेत. "आज मी लोकांना सांगणार आहे. काय करायचे ते करा. तुझी नोकरी खाऊन टाकेन. माझं पोलीस उपायुक्तांसोबत बोलणं करुन द्या. मी आधी सिव्हील लाईन्स पोलिसांसोबत बोलणार आहे. जे होईल ते इथेच होईल. तू मला हात लावलास तर मी तुझी नोकरी खाईन," असे स्वाती मालिवाल बोलत असल्याचे म्हटलं जात आहे.

त्यावेळी तिथले सुरक्षा कर्मचारी स्वाती मालिवाल यांना विनंती करताना दिसत आहेत. यावल बोलताना स्वाती मालिवाल या 'मी आत्ताच ११२ वर फोन केला आहे, पोलिस येऊ द्या, मग बोलू,असे म्हणतात. यावर कर्मचारी बाहेर पोलीस येतील, इथे येणार नाहीत, असे म्हणतात. त्यावर  बोलताना आता जे होईल ते आतमध्येच होईल, पोलीस आत येतील,असे मालिवाल म्हणाल्या.

Web Title: 'As usual the political hitman tried to save himself', Swati Maliwal's reply from that video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.